आता गालावरच टाळी, शिवसेनेने नीच राजकारण केलं; कधीच विसरणार नाही: राज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2017 02:14 PM2017-10-15T14:14:22+5:302017-10-15T14:15:26+5:30
आता हातावर नव्हे गालावर टाळी देणार, 'उद्धव ठाकरे यांच्या नीच राजकारणामुळंच मला शिवसेना सोडावी लागली. तेच राजकारण आजही सुरू आहे.
मुंबई - शिवसेनेने मुंबई महापालिकेतील मनसेचे सहा नगरसेवक फोडल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. नगरसेवकांची फोडाफोडी करुन शिवसेनेने गलिच्छ राजकारण केले. मी हे कधीच विसरणार नाही. उद्धव ठाकरेंच्या याच घाणेरड्या राजकारणामुळे मी शिवसेना सोडली होती. तेच राजकारण आजही सुरू आहे.
शिवसेनेने आता केलेलं नीच राजकारण मी हे कधीच विसरणार नाही आणि विसरलो नाही हे भविष्यात दिसेल. बाळासाहेबांनी फोडाफोडीचं राजकारण कधीच शिकवलं नाही. जनतेशी प्रतारणा करणारे राजकारण मी करत नाही, आता हातावर नव्हे गालावर टाळी देणार, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. पाठवायचेच असते तर मी सात पाठवले असते. एकाला तरी कशाला ठेवलं असतं, एवढं दळभद्री राजकारण मला करता येत नाही आणि कधी करणारही नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेनेवर निशाणा साधला.
राज यांनी अत्यंत तिखट शब्दांत उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला. 'उद्धव ठाकरे यांच्या नीच राजकारणामुळंच मला शिवसेना सोडावी लागली. तेच राजकारण आजही सुरू आहे. फोडाफोडीचे राजकारण करुन शिवसेनेने मराठी माणसाचा विश्वासघात केला. त्यांना मराठी माणसाशी घेणंदेणं नाही अशी टीका त्यांनी केली. शिवसेनेने पाच- पाच कोटी रुपये देऊन नगरसेवक फोडले. म्हणजेच हा व्यवहार सुमारे 30 कोटींचा आहे. मग एवढे पैसे सेनेकडे कुठून आले असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
जे सहा नगरसेवक शिवसेनेत गेले त्याची कुणकुण दीड महिन्यांपासून होती. मात्र ज्यांनी स्वतःला बाजारात विकायला ठेवलंच आहे, त्यांना कुणी बोलू शकत नाही. जे मानसिकदृष्ट्या भ्रष्ट आहेत, त्यांना ठेवून तरी काय करणार, पण महाराष्ट्रात राजकारण उमदं असावं. कुणी आयुष्यभर सत्तेत राहत नाही. एखादी गोष्ट करताना चुकीचा पायंडा पाडत नाही ना, याचं भान राजकीय पक्षांनी ठेवायला हवं, अशी अपेक्षाही राज ठाकरेंनी व्यक्त केली.