भाजपाच्या यशामुळे शिवसेना झाकोळली

By Admin | Published: February 24, 2017 07:17 AM2017-02-24T07:17:45+5:302017-02-24T07:17:45+5:30

मुंबईतच पक्षाच्या स्थापनेच्या मेळाव्यात बोलताना ‘सूरज निकलेगा... कमल खिलेगा’ असे उद्गार माजी पंतप्रधान

Shivsena lurks due to BJP's success | भाजपाच्या यशामुळे शिवसेना झाकोळली

भाजपाच्या यशामुळे शिवसेना झाकोळली

googlenewsNext

गौरीशंकर घाळे / मुंबई
मुंबईतच पक्षाच्या स्थापनेच्या मेळाव्यात बोलताना ‘सूरज निकलेगा... कमल खिलेगा’ असे उद्गार माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी काढले होते. मुंबई महापालिका निवडणुकीत ८२ जागा मिळवीत भाजपाने गुरुवारी ऐतिहासिक आणि अभूतपूर्व विजयाची नोंद करत ते खरे केले. शिवसेनेच्या तोडीस तोड जागा मिळवीत आपण धाकटे नाही तर महापालिकेच्या राजकारणात आपण आता बरोबरीचे असल्याचे भाजपाने गुरुवारी सिद्ध केले.
युतीच्या राजकारणात भाजपाच्या वाट्याला कायमच धाकट्या भावाची भूमिका आली. लोकसभा, विधानसभेच्या निकालानंतर आता महापालिकेच्या निकालांनी ते पूर्णपणे पुसले गेल्याची भावना भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आहे.
शिवसेनेने युती तुटल्याची घोषणा केल्यानंतर भाजपाने स्वबळावर मुंबईत सत्ता आणण्याचा निर्धार व्यक्त केला. एकीकडे पारदर्शक कारभार आणि मुंबईच्या विकासाचे आश्वासन द्यायचे तर दुसरीकडे महापालिकेच्या आजपर्यंतच्या गैरकारभाराचे खापर सर्वस्वी शिवसेनेवर फोडायचे, अशी दुहेरी रणनीती भाजपाने वापरली. त्याचा अपेक्षित परिणाम झाल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. मुंबईतील भाजपा नेत्यांनी वर्षभरापासूनच नालेसफाई, खड्डे या विषयांवरून शिवसेनेला टार्गेट करण्यास सुरुवात केली. मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेच्या ‘अरे ला कारे’ करत आपली भूमिका चोख पार पाडली.
भाजपाचा पारंपरिक मतदार मानला जाणारा गुजराती, उत्तर भारतीय समाजावरील पकड कायम करतानाच मराठी मतदार लांब जाणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली गेली. केवळ आम्हीच पारदर्शक कारभारातून मुंबईचा विकास साधू शकतो, हे पटवून देण्यात भाजपा यशस्वी झाली. परिणामी २० वर्षांतील धाकलेपण पुसले गेले.

‘आम्हीच मुंबईत नंबर वन’

निकालानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे तर आशिष शेलार यांनी
थेट ‘आम्हीच मुंबईत नंबर वन’ असल्याचे म्हटले आहे. ८२ जागा घेत भाजपा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला असला तरी १९९२ नंतर प्रथमच शिवसेना वगळता अन्य कोणत्या पक्षाने इतक्या मोठ्या प्रमाणात जागा जिंकल्या आहेत?

त्यामुळे मुंबई म्हणजे फक्त शिवसेना हे २५ वर्षांचे समीकरण भाजपाच्या यशाने मागे पडल्याचे चित्र आहे. शिवसेनेच्या भावनिक राजकारणापेक्षा विकासाला प्राधान्य देणारा, सोयीसुविधांची अपेक्षा करणारा मराठी मतदारही भाजपाकडे वळल्याचे चित्र आहे.

Web Title: Shivsena lurks due to BJP's success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.