शिवसेनेच्या आमदारांत तीव्र खदखद, स्वतंत्रपणे लढण्यास विरोध
By अतुल कुलकर्णी | Published: June 22, 2018 06:18 AM2018-06-22T06:18:06+5:302018-06-22T06:18:37+5:30
मंत्रिपदे व महामंडळावरील नियुक्ती मिळणार नसेल तर नागपूर अधिवेशनाला जायचे तरी कशाला? असा संतप्त सवालही या आमदारांनी केला.
मुंबई : लोकांमधून निवडून आलेल्या शिवसेना आमदारांमध्ये टोकाचा असंतोष धुमसत आहे. मंत्रिपद आम्हाला न देता विधान परिषदेच्या सदस्यांना दिली आहेत, ते आमची कामे करत नाहीत, नाराज आमदारांना नेतृत्वही विश्वासात घेतले जात नाही, अशा त्यांच्या तक्रारी असून, त्यांचा एक गट बैठक घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला जाणार आहे.
मंत्रिपदे व महामंडळावरील नियुक्ती मिळणार नसेल तर नागपूर अधिवेशनाला जायचे तरी कशाला? असा संतप्त सवालही या आमदारांनी केला. पक्षनेतृत्व स्बळाची भाषा करत असताना त्या भूमिकेलाच काही आमदारांनी सुरुंग लावला आहे. न्याय मिळणार नसेल तर आम्ही पक्षबांधणी कशी करायची व मतदारसंघ सांभाळायचे कसे? अशी उद्विग्नता त्यांनी बोलून दाखवली आहे.
शिवसेनेच्या काही आमदारांनी नाव न छापण्याच्या अटीवर ही खदखद व्यक्त केली. स्वतंत्रपणे लढण्याची भाषा परवडणारी नाही. तसे केल्यास आम्हाला मतदारसंघातून निवडून येणे अवघड आहे. मात्र, निवडून न येणारे काही नेते मातोश्रीवर जाऊन चुकीची माहिती देतात, असेही काही आमदार म्हणाले.
डॉ. दीपक सावंत यांना विधान परिषेदेची उमेदवारी दिली नसली तरी त्यांचे मंत्रिपद कायम आहे. त्यांना आणखी ६ महिने मंत्रीपदी कायम ठेवण्याचे घाटत आहे. तसे झाल्यास आमच्या निवडून येण्याला अर्थ नाही, असे सांगून पश्चिम महाराष्टÑातील एक आमदार म्हणाला की, त्या जागी विधानसभा सदस्याला संधी दिली पाहिजे.
विधान परिषद सदस्यांना मंत्रीपदे देताना आम्हाला सांगितले की, निवडणुकीच्या एक वर्ष आधी त्यांचे राजीनामे घेऊन आम्हाला
मंत्री पदे दिली जातील. पण ते होताना दिसत नाही. सेनेचे मंत्री मातोश्रीपेक्षा ‘वर्षा’वर जास्त निष्ठा दाखवतात. मातोश्रीवरील बैठकांची माहितीही ‘वर्षा’वर कळवण्यात धन्यता मानतात. आम्ही निष्ठेने मतदारसंघात शिवसेना बांधत आहोत, पण आम्हाला कोणी विचारत नाही. महामंडळाच्या नेमणुकाही चार वर्षे झाली तरी केल्या जात नाहीत.
येत्या आठवड्यात आम्हा काही आमदारांची बैठक होणार आहे. मंत्रिमंडळात व महामंडळांत विधानसभा सदस्यांना सामावून न घेतल्यास आम्ही नागपूरला जाणार नाही आणि ‘वर्षा’वर जाऊन मुख्यमंत्र्यांना आमचा मानस बोलून दाखवू. पण घुसमट सहन करणार नाही, असे या आमदारांनी बोलून दाखवले.