शिवसेना आमदार - मंत्र्यांमध्ये खडाजंगी
By admin | Published: March 10, 2017 01:12 AM2017-03-10T01:12:59+5:302017-03-10T01:12:59+5:30
शिवसेनेचे मंत्री आम्हाला विचारत नाहीत, भाजपाचे पालकमंत्री जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत त्यांच्या आमदारांना झुकते माप देतात, शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाच्या
- अतुल कुलकर्णी, मुंबई
शिवसेनेचे मंत्री आम्हाला विचारत नाहीत, भाजपाचे पालकमंत्री जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत त्यांच्या आमदारांना झुकते माप देतात, शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाच्या ठरावावर सभागृहात चर्चा होताना आपले मंत्री कुठे होते, अशा शब्दात शिवसेनेच्या आमदारांनी गुरुवारी स्वपक्षाच्या मंत्र्यांनाच फैलावर घेतले.
विधान भवनातील पक्ष कार्यालयात सकाळी झालेल्या बैठकीत ही खडाजंगी झाली. या बैठकीतील ‘अजेंड्या’ची कुणकुण लागताच पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांनी बैठकीकडे पाठ फिरवली. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना मात्र आमदारांच्या रोषाला सामोरे जावे लागले. आमदारांच्या प्रश्नांचा भडिमार झाल्याने रावते चांगलेच संतप्त झाले. मी देखील शिवसैनिक आहे. तुम्ही माझा अपमान करत आहात अशा शब्दात त्यांनी आमदारांना सुनावले. त्यावर आम्ही आमचे प्रश्न मांडतो म्हणजे तुमचा अपमान करतो का? असा प्रतीसवाल काही आमदारांनी केल्याचे समजते.
जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत आमदारांनी त्यांचे प्रस्ताव नियमानुसार द्यावेत, असे एका राज्यमंत्र्यांनी सांगितले तेव्हा भडकलेल्या एका आमदाराने त्या राज्यमंत्र्यालाच ऐकेरीत झापले. तीन तीन टर्म आम्ही आमदार आहोत. मंत्री झाला म्हणून आता तू आम्हाला शिकवणार का? असा आवाज चढवत त्या मंत्र्यांचा उध्दार केल्याचे सुत्रांनी सांगितले.
आमची कामं होत नसतील तर तुम्ही सभागृहात बसता कशाला? असे सवालही आमदारांनी केले. पक्षाच्या बैठकीत एका मंत्र्याने आम्ही आता बॅगा घेऊन प्रचाराला निघू असे सांगितले होते. पण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एकाही मंत्र्यांनी वारंवार मागणी करुनही आम्हाला सभा दिल्या नाहीत, मंत्र्यांच्या दालनात आम्ही गेलो तर ते आमच्याकडे पाहून दुसऱ्याशी बोलत बसतात. आमचा असा अपमान होणार असेल तर कशाला हवे तुम्हाला मंत्रीपद? असा संतप्त सवाल आमदारांनी केला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या प्रस्तावावर विधानसभेत चर्चा होणार होती. प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांनी सर्व आमदारांना त्याची माहिती द्यायला हवी होती. मंत्र्यांनीही कामकाज पत्रिका पाहून सगळ्यांना सांगायला हवे होते पण प्रभू यांनी माहितीच दिली नाही, असे आरोप केले गेले. प्रभू नेहमीच आमदारांना कायम अंधारात ठेवतात. माहितीच देत नाहीत, परिणामी एवढ्या महत्वाच्या विषयावर सभागृहात शिवसेनेचे आमदार चर्चेसाठी सभागृहात नव्हते असे चित्र राज्यभर गेले. पक्ष वाढावा म्हणून मंत्री या नात्याने तुम्ही काय करता? तुमच्याच मतदारसंघात किती नगरसेवक तुम्ही निवडून आणले याची आकडेवारी हिंमत असेल तर सांगा, असे सवालही मुंबई, कोकणातल्या आमदारांनी मंत्र्यांना केले.
- बैठकीनंतर बोलताना एक आमदार म्हणाला, मंत्री अर्जुन खोतकर यांनी जालन्यात भाजपाचे रावसाहेब दानवे यांच्याशी हातमिळवणी करुन नगराध्यक्षपदाचा उमेदवारच दिला नव्हता.
- मंत्रीच असे हे वागत असतील तर पक्ष वाढणार कसा, असा सवालही त्या आमदाराने केला.
शेवटी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सगळ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण मिळून काम करु, असे म्हणत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केल्याचे समजते.
- बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी बैठकीत आमदारांनी चांगले मत व्यक्त केल्याचे कळते.