Sanjay Raut: "हनुमान चालीसा पठण करणे गुन्हा आहे का?", फडणवीसांचा फोटो शेअर करत संजय राऊत म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 09:22 AM2022-04-26T09:22:08+5:302022-04-26T09:22:25+5:30
Sanjay Raut: शिवसेना नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचा फोटो शेअर करत, त्यांच्या प्रश्नाला उत्तर दिले आहे.
मुंबई: 'हनुमाम चालिसा'मुळे राज्यात वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. राणा दाम्पत्याच्या अटकेवरुन भाजपकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली जातीये. कालच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकावर निशाणा साधला. 'हनुमान चालिसा पठण करणं महाराष्ट्रात गुन्हा आहे का?' असा सवाल फडणवीसांनी केला.
BJP leadrs ask whthr readng #HanumanChalisa is angst law in Mah'tra?
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 25, 2022
No Sir,absolutely NOT!
BUT
using Hanuman fr politics & incitng violnce in hs name IS !
Chalisa is read in temples or b4 d idol.Readng it on roads is angst the religion!
Not SEDITION, it's BLASPHEMY & by BJP! pic.twitter.com/cx31EpBq6n
शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांनी ट्विटरवर देवेंद्र फडणवीस यांचा कालच्या पत्रकार परिषदेतील फोटो शेअर केला आहे. त्या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहीले की, "भाजपा नेत्यांनी विचारलं आहे की, हनुमान चालीसा म्हणणे हे महाराष्ट्रामध्ये कायद्याविरोधात आहे का? तर नक्कीच नाही. मात्र हनुमानाचा वापर राजकारणासाठी करणे आणि त्याच्या नावाखाली हिंसेसाठी लोकांना प्रवृत्त करणे हा गुन्हा आहे. चालीसा ही मंदिरांमध्ये किंवा देवासमोर म्हटली जाते. रस्त्यावर तिचं पठण करणं हे धर्माच्याविरोधात आहे. हा राजद्रोह नाही तर ही भाजपाकडून केली जाणारी ईश्वनिंदा आहे," असा घणाघात राऊत यांनी केला आहे.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करू म्हणणाऱ्या खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांना तुरुंगात अतिशय वाईट वागणूक दिली जात आहे. हनुमान चालीसा म्हणण्याला इतका विरोध कशासाठी? भारतात हनुमान चालीसा पठण करायची नाही, मग काय पाकिस्तानात म्हणायची का? हनुमान चालिसा मातोश्रीबाहेर पठण करू म्हणाले, तर राणा दाम्पत्यावर थेट राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला गेला. हनुमान चालिसा म्हटल्यानं जर राजद्रोह होत असेल, तर मग आमच्यातला प्रत्येक जण रोज राजद्रोह करेल, असे म्हणत फडणवीसांनी सरकारवर टीका केली होती.
'मुंबईत होत असलेले हल्ले हे मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने'
मुंबईत भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांवर झालेल्या हल्ल्यांवरुनही फडणवीसांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले. विरोधकांना नामोहरम करण्यासाठी, त्यांच्यावर हल्ले करण्यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी विभाग वाटून घेतले आहेत. मुंबईमध्ये सध्या जे काही घडत आहे त्याची सुत्रे मुख्यमंत्री कार्यालयाकडून हलवली जात आहेत. तर राज्यात इतरत्र जे काही घडतंय ते गृहमंत्री कार्यालयाकडून घडवलं जात आहे. मुंबईत मुख्यमंत्र्यांनी करायचं आणि महाराष्ट्राच्या इतर भागात गृहमंत्र्यांनी करायचं असं ठरलं आहे, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.