विरोधी पक्षाचा नव्हे तर महाराष्ट्रप्रेमींचा मोर्चा; संजय राऊतांचा भाजपावर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 11:32 AM2022-12-16T11:32:10+5:302022-12-16T11:32:32+5:30
सरकार निर्लज्ज आहे. सत्ताधाऱ्यांना महापुरुषांबद्दल संवेदना नसेल तर हे सरकार लाचार आहे अशी बोचरी टीका राऊतांनी केली.
मुंबई - महापुरुषांच्या अवमानाविरोधात मुंबईत महाविकास आघाडीकडून भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र हा मोर्चा राज्यातील विरोधी पक्षाचा नसून महाराष्ट्रप्रेमींचा आहे. ज्याप्रकारे राज्यातील महापुरुषांचा अपमान सुरू आहे. सीमाप्रश्नावर अजूनही कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमक आहेत. महाराष्ट्रातले उद्योग बाहेर पळवले जातायेत. हा महाराष्ट्रावर खूप मोठा अन्याय आहे आणि सरकार त्यावर गप्प बसलंय. त्यामुळे समस्त महाराष्ट्रप्रेमींना आवाहन आहे तुम्ही मोर्चाला या असं शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊतांनी म्हटलं आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, पोलीस प्रशासन आणि सरकार यांच्याकडे मोर्चासाठी रीतसर परवानगी मागितली. महाराष्ट्रात आंदोलन करताना लोकशाही मार्गाने बंदी आली असेल तर सरकारने तस जाहीर करावं. आणीबाणी कुणी पुढच्या दाराने आणली आहे का? हा मोर्चा महाराष्ट्र प्रेमींचा आहे/ याप्रकारे देवतांचा अपमान सुरू आहे. डॉ. बाबासाहेबांचा अपमान सुरू आहे. सावित्रीबाईंचा अपमान सुरू आहे. शिवाजी महाराजांचा अपमान सुरू आहे. त्यासाठी हा मोर्चा आहे. महाराष्ट्र प्रेमींच्या मोर्चाला सरकार परवानगी नाकारत असेल तर मग या राज्यावर महाराष्ट्रद्रोही सरकार बसलेलं आहे अशी टीका त्यांनी केली.
तसेच सरकारमधील लोकांनी मोर्चात सामील झालं पाहिजे, हा महाराष्ट्रासाठी मोर्चा आहे. मोर्चाला परवानगी नाकारण्याची कोणी हिंमत करेल असं मला वाटतं नाही. त्याचे फार वेगळे परिणाम महाराष्ट्रात उमटतील. महाराष्ट्रद्रोही असे उद्योग करू शकतात. मोर्चा जाहीर झालाय आणि तो होईल. संयुक्त महाराष्ट्रात ज्याप्रकारे महाराष्ट्रप्रेमींचे मोर्चे निघाले तशाप्रकारे हा मोर्चा आहे. अलोकशाही पद्धतीने घटनाबाह्य सरकार राज्यात बसलंय. आम्ही कुठलेही घटनाबाह्य काम करत नाही. लोकशाही मार्गानेच आम्ही पुढे जात आहोत त्यावरच हे सरकार खाली खेचू असा इशाराही संजय राऊतांनी दिला.
सरकारवर बोचरी टीका
सरकार निर्लज्ज आहे. सत्ताधाऱ्यांना महापुरुषांबद्दल संवेदना नसेल तर हे सरकार लाचार आहे. म्हणून तर हा महाराष्ट्रप्रेमींचा मोर्चा आहे अशा शब्दात राऊतांनी बोचरी टीका केली.