Sanjay Raut: "आधी निवडणुका पुढे ढकलल्या आणि आता दंगली घडवल्या", संजय राऊतांचा भाजपावर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 11:14 AM2022-04-19T11:14:10+5:302022-04-19T11:14:36+5:30
Sanjay Raut: "मुंबईत तुमची ताकद नाही, त्यामुळेच तुम्ही कुणालातरी पकडून भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला."
मुंबई: 'दिल्लीतील स्थानिक निवडणुका जिंकण्यासाठी भाजपकडून दंकली घडवल्या जात आहेत,' असा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. दिल्लीसह देशातील अनेक ठिकाणी जातीय हिंसाचार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यावरुन संजय राऊतांनीभाजपावर निशाणा साधलाय.
'निवडणुका जिंकण्यासाठी दंगली घडवल्या'
मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "दिल्लीतील स्थानिक निवडणुका पुढे ढकलणे हा भाजपच्या योजनेचा भाग आहे. देशातील दोन प्रमुख शहरांमध्ये ज्याप्रकारे दंगलींचे वातावरण तयार केले जात आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे, तिथे स्थानिक निवडणुका होणार आहेत. त्या आधी तुम्ही पुढे ढकलल्या आणि आता दंगली केल्या. हे सगळं त्या निवडणुका जिंकण्यासाठी सुरू आहे,' असा आरोप संजय राऊत यांनी केला.
'राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला'
यावेळी संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही नाव न घेता टीका केली. "दिल्लीप्रमाणे मुंबईतही तुम्ही हाच तणाव निर्माण करत आहात. मुंबईत तुमची ताकद नाही, त्यामुळे तुम्ही कुणालातरी पकडून हे काम दिलं आणि भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला. राजकीय फायद्यासाठी दंगलींचे वातावरण निर्माण केले. यामुळे देशाची अर्थव्यवस्था श्रीलंका आणि युक्रेनपेक्षाही खाली जाईल," असंही राऊत म्हणाले.