"सरकार टिकेल किंवा जाईल, पण...", संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 11:02 AM2022-06-24T11:02:56+5:302022-06-24T11:03:53+5:30

Sanjay Raut Tweet : नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी दिली आहे. नारायण राणे यांच्या धमकीचा समाचार घेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे.

shivsena mp sanjay raut tweet on union minister narayan ranes threat to ncp leader sharad pawar maharashtra political crisis | "सरकार टिकेल किंवा जाईल, पण...", संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

"सरकार टिकेल किंवा जाईल, पण...", संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

Next

मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक नाट्यमय घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच बंडखोर आमदार हे सभागृहात येणारच आहेत आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार आहे, त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठीण होईल, अशी थेट धमकी ट्विटद्वारे केंद्रीय मंत्री नारायण  राणे (Narayan Rane) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना धमकी दिली आहे. त्यामुळे राजकारणात एकच खळबळ माजली. आता नारायण राणे यांच्या याच धमकीचा समाचार घेत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले आहे की, "महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्याचा प्रयत्न केला तर शरद पवार यांना घरी जाऊ देणार नाही. रस्त्यात अडवू, अशी धमकी भाजपचा एक केंद्रीय मंत्री देतो. ही भाजपची अधिकृत भूमिका असेल तर तसे जाहीर करा. सरकार टिकेल किंवा जाईल... पण शरद पवार यांच्या बाबत अशी भाषा महाराष्ट्राला मान्य नाही." तसेच, संजय राऊत यांनी हे ट्विट पीएमओला (@PMOIndia) टॅग केले आहे.

दरम्यान, शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेचे वरिष्ठ नेतृत्त्व कमालीचे अस्वस्थ झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडून जाणाऱ्या आमदारांची संख्या वाढत असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडत जवळपास ४० हून अधिक आमदारांचा एक मोठा गट आपल्या सोबत उभा केला आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे आहेत. 

काय म्हणाले शरद पवार आणि नारायण राणे? 
राज्यातील राजकीय घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला आणि आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी "बाहेर गेलेले आमदार राज्यात परतल्यानंतर शिवसेनेसोबत असतील असा विश्वास वाटत आहे. विधानसभेत ज्या वेळी बहुमत चाचणी होईल त्यावेळी समजेल हे सरकार बहुमतात आहे. अशी स्थिती मी महाराष्ट्रात याआधी अनेकदा पाहिली आहे. आताच्या परिस्थितीवर मात करुन हे सरकार कायम राहिल असा विश्वास आहे. जे लोक बाहेर गेले, त्यांच्या नेत्याचे म्हणणे आहे की काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेत असल्याने ते नाराज आहेत. मग ही नाराजी या आधी का काढली नाही? हिंदुत्वाचा मुद्दा या आधी का काढला नाही? संजय राऊत यांनी त्यांना इकडे येऊन भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले. त्यामुळे बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना इकडे यावेच लागेल", असे शरद पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान, शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर नारायण राणेंनी एक ट्विट केले आहे. त्यामध्ये नारायण राणे यांनी म्हटले आहे की, "माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, 'सभागृहात येऊन दाखवा', ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठीण होईल."

Web Title: shivsena mp sanjay raut tweet on union minister narayan ranes threat to ncp leader sharad pawar maharashtra political crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.