जुंपली! हरवल्याशिवाय दाढी काढणार नाही असं म्हणणाऱ्या राणेंना विनायक राऊतांचं प्रतिआव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 04:43 PM2017-09-19T16:43:03+5:302017-09-19T17:33:19+5:30

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांचा पराभव केल्याशिवाय दाढी काढणार नाही, अशी प्रतिज्ञा करणा-या राणेंना विनायक राऊत यांनी प्रतिआव्हान दिलं आहे.

shivsena mp vinayak raut answer to nilesh rane | जुंपली! हरवल्याशिवाय दाढी काढणार नाही असं म्हणणाऱ्या राणेंना विनायक राऊतांचं प्रतिआव्हान

जुंपली! हरवल्याशिवाय दाढी काढणार नाही असं म्हणणाऱ्या राणेंना विनायक राऊतांचं प्रतिआव्हान

Next

सिंधुदुर्ग, दि. 19 - शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांचा पराभव केल्याशिवाय दाढी काढणार नाही, अशी प्रतिज्ञा माजी खासदार निलेश राणेंनी कुडाळमधील सभेत घेतली होती. निलेश राणेंच्या या वक्तव्यावर विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

निलेश राणे यांचं आव्हान स्वीकारतो, त्यांना अडीच लाख मतांनी पराभूत करु, असं म्हणत राऊतांनी प्रतिआव्हान दिलं आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांनीच निलेश राणे यांचा पराभव केला होता. त्यावेळी या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर जोरदार शाब्दिक हल्ले चढवले होते. 

काय म्हणाले विनायक राऊत - 
मी उमेदवार असो वा अन्य कोणी पण निलेश राणे यांना अडीच लाखांहून अधिक मतांनी पराभूत करणारच, असं विनायक राऊत यांनी ठणकावलंय.

नारायण राणे ब्रम्हराक्षस -
 नारायण राणे ब्रम्हराक्षस आहे तो कधी भाजपात जातो याची आम्ही वाटच पाहात आहोत. नारायण राणे यांचं शक्तीप्रदर्शन नव्हतं तर ते  केविलवाणं दर्शन होतं, अशा शब्दात राणेंवर राऊत यांनी टीका केली. 

मला शिवसेनेकडून ऑफर, पण जाणार नाही; नारायण राणेंचा खुलासा-

कर्तृत्व असणा-याला काँग्रेस साथ देत नाही. त्यामुळे काँग्रेसला भविष्य नाही, अशी टीका करत 21 सप्टेंबरला घटस्थापनेदिवशी पुढील निर्णय जाहीर करू, अशी घोषणा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी केली. येत्या 21 सप्टेंबरला घटनस्थापनेच्या मुहूर्ताला आपल्या पुढील राजकीय वाटचालीबाबत ते घोषणा करणार आहेत.
शिवसेनेकडून मला ऑफर, पण जाणार नाही -

‘मला शिवसेनेकडून ऑफर होती. त्यांच्यातील काही जणांनी मला त्यांच्या नेत्यांशी थेट बोलणी करण्यास सांगितलंही होतं. पण मी सुरुवातीलाच त्या गोष्टीला नकार दिला. मी स्पष्ट शब्दात  सांगितलं की, मला शिवसेनेत यायचं नाही.’ सिंधुदुर्गात झालेल्या सभेनंतर राणेंनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत शिवसेनेकडून मला ऑफर असल्याचा खुलासा केला आहे. शिवसेनेकडून ऑफर होती पण त्या गोष्टीला नकार दिला असं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी बोलताना त्यांनी प्रत्येक पक्षात माझ्यासाठी जागा असल्याचं म्हटलं. सिंधुदुर्गात शक्तीप्रदर्शन केलं नाही तर तो लोकांचा, कार्यकर्त्यांचा उत्स्फुर्तपणा होता असंही म्हणाले. त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावरही अकार्यक्षम असल्याचा ठपका ठेवला. 
 भाजपामध्ये जाणार की पक्ष काढणार?
राणे यांनी अजून आपले पत्ते उघड केलेले नाहीत. घटस्थापनेदिवशी ते आपला निर्णय जाहीर करणार आहेत. पण तो निर्णय काँग्रेस सोडण्याचा, भाजपात जाण्याचा की, नवा पक्ष काढण्याचा असेल? याविषयी उत्सुकता आहे. राणे यांचा तूर्त भाजपाप्रवेश होणार नाही. दिवाळीपर्यंत ते ‘बाहेर’ राहून काँग्रेसमधून कोण-कोण सोबत येतात, याची चाचपणी करतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
31 जिल्हे पाठीशी -
घटस्थापनेदिवशी मी माझा निर्णय जाहीर करणार, त्या वेळी कोण कोणाला धक्का देतो ते पाहू. महाराष्ट्राच्या जनतेच्या आणि कोकणी जनतेच्या भल्यासाठी मी आणि माझे दोन्ही पुत्र राजकारणात आहोत. राज्यातील ३१ जिल्हे माझ्या पाठीशी आहेत, असा दावाही राणे यांनी केला.

Web Title: shivsena mp vinayak raut answer to nilesh rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.