शिवसेना ही तर सत्तेला चिकटलेला ‘मुंगळा’ - शरद पवार
By admin | Published: June 25, 2016 06:55 PM2016-06-25T18:55:15+5:302016-06-25T18:55:15+5:30
भाजपने कितीही टीका केली तरी शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही. कारण तिची अवस्था कोल्हापुरी गुळाला डसलेल्या मुंगळ्यासारखी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी केली
Next
>विश्वास पाटील
कोल्हापूर : भाजपने कितीही टीका केली तरी शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही. कारण तिची अवस्था कोल्हापुरी गुळाला डसलेल्या मुंगळ्यासारखी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केली. शिवसेनेने पाठिंबा काढून घेतलाच आणि निवडणूकीला सामोरे जायची वेळ आली तर त्यास राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांना लोकशाहीत तयारी ठेवावी लागते परंतू तसे घडण्याची शक्यता सध्यातरी दिसत नाही अशीही टिप्पणी पवार यांनी केली.
भाजपने संभाजीराजे छत्रपती यांना राष्ट्रपती नियुक्त कोट्यातून खासदार केले. त्याबध्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना पवार म्हणाले,‘ हा निर्णय राजकीय नाही. आम्ही त्याकडे राजकीय दृष्टीने बघत नाही. परंतू थोडे मागे जावून इतिहास पाहिला तर असे दिसते की पूर्वी छत्रपती हे पेशव्यांची नियुक्ती करायचे. हे पेशवे फडणवीस नेमत असत परंतू आता महाराष्ट्राच्या राजकारणात उलटे झाले आहे. इथे तर फडणवींसांनीच छत्रपतींची नियुक्ती केली आहे. हे प्रथमच घडत आहे.’
पुण्यात शनिवारी पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणारा समारंभ हा महापालिकेचा असूनही त्याच्या निमंत्रण पत्रिकेत चक्क महापौरांचेच नांव नाही. खरे तर या समारंभाच्या त्याच निमंत्रक आहेत. परंतू त्यांना डावलले गेले. मुख्यमंत्र्यांनी त्याबध्दल अनावधानाने प्रकार घडल्याचे जाहीरपणे सांगितले. त्यामुळे महापौर त्या कार्यक्रमास उपस्थित राहिल्या. परंतू या सगळ्या प्रकरणात राज्यकर्त्यांनी मनाचा मोठेपणा दाखविला नाही असाच अनुभव आल्याची टीकाही पवार यांनी केली.