शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसची स्पष्ट बहुमतासाठी कसरत
By Admin | Published: February 19, 2017 03:15 AM2017-02-19T03:15:19+5:302017-02-19T03:15:19+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तुरुंगात अडकल्याने, यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत स्वबळावर सोडाच, काँग्रेस व घटक पक्षांना जोडीने घेऊनही सत्ता राखणे राष्ट्रवादी काँग्रेसला अवघड होणार आहे.
- गणेश धुरी, नाशिक
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तुरुंगात अडकल्याने, यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत स्वबळावर सोडाच, काँग्रेस व घटक पक्षांना जोडीने घेऊनही सत्ता राखणे राष्ट्रवादी काँग्रेसला अवघड होणार आहे. जी परिस्थिती राष्ट्रवादीची तीच जिल्हा परिषदेवर भगवा फडकविण्यासाठी आसुसलेल्या शिवसेनेचीही आहे.
शिवसेनेला स्वबळावर बहुमत गाठण्यासाठी प्रसंगी काँग्रेस-राष्ट्रवादीलाच सोबत घ्यावे लागण्याची चिन्हे आहेत. कारण भाजपासोबत मुंबईपासून गडचिरोलीपर्यंत संबंध ताणले गेल्याने, हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापण्याची सुतराम शक्यता नाही.
जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या अनुषंगाने शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात सभा झाल्या. यापूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या जाहीरसभा झाल्या आहेत.
‘मिशन-४१ प्लस’चा नारा दिलेल्या भाजपानेही ग्रामीण भागात सर्व गट-गणात उमेदवार देण्याची काळजी घेतली आहे. आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या ग्रामीण
भागात चौकसभा झाल्या आहेत. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनीही पूर्व भागात सभांचा धडाका लावला आहे.
कॉँग्रेसकडून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा अपवाद वगळता अद्याप मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या नाहीत. पुरेसे उमेदवार उभे करण्यातही काँग्रेसला यश आलेले नाही. मागील वेळी सर्वाधिक संख्याबळ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला यंदा आहे. ते संख्याबळ टिकविता येणे, जसे
अवघड आहे, तशीच स्थिती
काँग्रेसची आहे. मागील वेळी
दोन आकडी संख्या गाठलेल्या काँग्रेसला यंदा तेवढ्याही जागा मिळविणे दुरापास्त दिसत आहे.
राष्ट्रवादी व काँग्रेसने आपल्या
सत्ता काळात कोणतेही प्रभावशाली कार्य केल्याचे दिसून येऊ शकले
नाही. उलट विविध घोटाळ््यांच्या चर्चांमुळेच जिल्हा परिषद गाजली. त्यामुळे अनेक इच्छुकांनी काँग्रेस व राष्ट्रवादीऐवजी शिवसेना, भाजपाची तिकिटे मिळवून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. शिवाय गेल्या तीन पंचवार्षिकपासून राष्ट्रवादी काँग्रेसने ज्यांच्या खांद्यावर नाशिकची जबाबदारी टाकली आणि ज्यांनी ती सांभाळून सत्ताही आणली, ते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ वर्षभरापासून तुरुंगात असल्याने राष्ट्रवादी सैरभैर झाली आहे.
नाही म्हणायला शरद पवार, अजित पवार व सुप्रिया सुळे या पवार कुटुंबीयांनी राष्ट्रवादीची नौका सांभाळण्याचा प्रयत्न केला.
मात्र, पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने, यंदा राष्ट्रवादीला दीड दशकापासून असलेली सत्ता टिकविणे अवघड बनले आहे. अशा स्थितीत स्पष्ट बहुमताने त्यांची जागा पटकाविणे अन्य पक्षांसाठीही बरेचसे अवघडच आहे.
‘मिशन- ४१+’ अवघड
भाजपाने या निवडणुकीसाठी ‘मिशन- ४१ प्लस’चा नारा दिला आहे. त्यासाठी विष्णू सावरा व जयकुमार रावल या दोन मंत्र्यांसह खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. मागील निवडणुकीत अवघे चार सदस्य निवडून आलेल्या भाजपासाठी हे ‘मिशन-४१ प्लस’ अशक्य आहे.