शिवसेनेला नाही शेतक-यांशी घेणे-देणे!
By admin | Published: January 22, 2017 02:50 AM2017-01-22T02:50:34+5:302017-01-22T02:50:34+5:30
गुलाबराव गावंडे यांचे टीकास्त्र.
अकोला, दि. २१- शिवसेना शेतकर्यांच्याप्रती संवेदशिल नसून, शेतकर्यांच्या वेदनेचे शिवसेनेला काही घेणे-देणे नसल्याचे टीकास्त्र माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांनी शनिवारी येथे सोडले.
महानगरपालिका निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी बसवराज पाटील यांची पक्षाच्या जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थित माजी मंत्री गुलाबराव गावंडे पत्रकारांशी बोलत होते. सावकारी कायद्यानंतर राज्यातील शेतकर्यांसाठी पाच कार्यक्रम आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले होते; मात्र शेतकर्यांच्या दृष्टीने विषय काढला, त्याकडे दुर्लक्ष करीत दुसराच ते विषय काढायचे , असे सांगत शेतकर्यांचे शिवसेनेला काहीही घेणे-देणे नाही, असा आरोपही गुलाबराव गावंडे यांनी केला. राज्यातील शेतकर्यांची खर्या अर्थाने तळमळ असलेला राष्ट्रवादी काँग्रेस हा एकमेव पक्ष असल्याचेही गावंडे यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी बसवराज पाटील, माजी आमदार प्रा. तुकाराम बिडकर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, ऋषिकेश पोहरे, महानगराध्यक्ष अजय तापडिया यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
स्वगृही चाललो बरं..!
शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाची भूमिका गुलाबराव गावंडे यांनी विशद केली. शिवसेनेपूर्वी मी एस काँग्रेसचा पदाधिकारी होतो, तेव्हा शरद पवार यांच्याशी संबंध आला. त्यामुळे मी स्वगृही चाललो बरं.. असे सांगत गुलाबराव गावंडे यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाची भूमिका स्पष्ट केली.