शिवसेना पदाधिकारी भाजपामध्ये दाखल
By admin | Published: September 18, 2016 12:54 AM2016-09-18T00:54:40+5:302016-09-18T00:54:40+5:30
जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय गायकवाड, माजी विभागप्रमुख तुषार हिंगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी रात्री भाजपामध्ये प्रवेश केला.
पिंपरी : शिवसेनेचे माजी शहरप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय गायकवाड, माजी विभागप्रमुख तुषार हिंगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी रात्री भाजपामध्ये प्रवेश केला. या वेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष हर्षल ढोरे व काँग्रेसच्या नगरसेविका जयश्री गावडे यांचे पती वसंत गावडे यांचेही भाजपात स्वागत करण्यात आले. त्यामुळे शहरात भाजपाकडून तोडफोडीचे राजकारण सुरू झाल्याची चर्चा आहे.
आगामी महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी रात्री पुण्यात बैठक झाली. ही बैठक संपल्यानंतर पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम करण्यात आला.
या वेळी दत्तात्रय गायकवाड, तुषार हिंगे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांनी दोघांचेही पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केले. या वेळी भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख एकनाथ पवार, शहर सरचिटणीस सारंग कामतेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दत्तात्रय गायकवाड यांनी दिघी गावचे सरपंचपद, जिल्हा परिषदेचे सदस्यपद, तसेच शिवसेनेचे नगरसेवकपद आणि गटनेतेपद सांभाळले आहे. २००२मध्ये प्रभाग पद्धतीने झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांनी दिघी भागातून शिवसेनेचे पॅनेल निवडून आणले होते. त्यामुळे त्यांना महापालिकेत शिवसेनेचे गटनेतेपद देण्यात आले होते. शिवसेनेचे माजी विभागप्रमुख तुषार हिंगे यांनी २०१२मध्ये मोरवाडी प्रभाग क्रमांक २७मध्ये महापालिका निवडणूक लढविली होती.
(प्रतिनिधी)
>फूट : राष्ट्रवादी, काँग्रेस पदाधिकाऱ्यांचेही स्वागत
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष हर्षल ढोरे आणि काँग्रेसच्या नगरसेविका जयश्री गावडे यांचे पती वसंत गावडे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला होता. हे दोन्ही पदाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या पुण्यातील बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ढोरे आणि गावडे यांचेही पुष्पगुच्छ पक्षात स्वागत करण्यात आले.