'आम्ही आयते आलेलो नाही, राऊतांनी लोकांमधून निवडून दाखवावं', भुमरेंचे ओपन चॅलेंज
By ओमकार संकपाळ | Published: July 7, 2022 02:29 PM2022-07-07T14:29:50+5:302022-07-07T14:30:14+5:30
खासदार संजय राऊत यांनी बंडखोर संदिपान भुमरे यांच्यावर टीका केली होती, त्यावर संदिपान भुमरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबई: शिवसेनेतील बंडखोरी आणि शिंदे गटाने भाजपसोबत हातमिळवणी करुन स्थापन केलेलं, यामुळे शिवसेनेतील अंतर्गत दरी वाढत चालली आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत सातत्याने बंडखोर आमदारांवर टीका करत आहेत. यातच संजय राऊत यांनी बंडखोर संदिपान भुमरे यांच्यावर टीका करताना, त्यांनी माझ्यासमोर लोटांगण घातलं, अशी टीका केली होती. त्यावर आता भुमरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
'मी फक्त आभार व्यक्त केले'
संदीपान भुमरे यांनी यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना संजय राऊत यांचा दावा फेटाळून लावला. 'महाविकास आघाडीची सत्ता आली, मी मंत्री झालो, तेव्हा त्यांचे धन्यवाद मानण्यासाठी आमची भेट झाली. पण मी त्यांना लोटांगण कशाला घालू? मी एक कार्यकर्ता आहे. 35 वर्षांपासून शिवसेनेसाठी झटत आलोय. मंत्री झाल्यानंतर फक्त आभार व्यक्त केले, लोटांगण घालण्याचा संबंध नाही', असे स्पष्टीकरण भुमरेंनी दिले.
'राऊतांनी शांत बसावं'
ते पुढे म्हणाले की, 'संजय राऊत यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. ते रोज तेच-तेच बोलतात. त्यांच्याकडे बोलण्यासाठी दुसरं काही नसतं. महाराष्ट्रातील जनतेलाही आता त्याचा कंटाळा आला आहे. आता संजय राऊत टीव्हीवर आले की, लोक टीव्ही बंद करतात. त्यामुळे संजय राऊतांनी जास्त न बोलता, शांत बसलं पाहिजे', असा सल्लाही राऊतांना दिला.
'राऊतांना ओपन चॅलेंज'
यावेळी भुमरेंनी राऊतांना ओपन चॅलेंज दिलं. 'कोणत्या पातळीवर जाऊन टीका करायची याला काही मर्यादा असते. आम्ही 3-4 लाख मतांनी निवडून आलेलो आहोत. आम्ही त्यांच्याप्रमाणे आयते निवडून आलो नाहीत. संजय राऊतांनी राजीनामा द्यावा आणि जनतेतून निवडून यावं, मग आम्ही त्यांना मानू, असंही भुमरे म्हणाले.