शिवसेनेने धुडकावला युतीचा प्रस्ताव, भाजपाचाही घेतला समाचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 06:28 AM2018-04-10T06:28:09+5:302018-04-10T06:28:09+5:30
बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे युतीबाबत सकारात्मक संकेत देणाऱ्या भाजपा नेत्यांना शिवसेनेने चांगलेच फटकारले आहे. ‘शिवसेनेचा वाघ हा पिंज-यातील वाघ नसल्याने तो राज्याच्या व राष्ट्राच्या प्रश्नांवर गर्जना करीत आहे. वाघाला रोखणे किंवा गोंजारणे आता शक्य नाही,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुखपत्रातून भाजपाचा समाचार घेतला आहे.
मुंबई : बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे युतीबाबत सकारात्मक संकेत देणाऱ्या भाजपा नेत्यांना शिवसेनेने चांगलेच फटकारले आहे. ‘शिवसेनेचा वाघ हा पिंज-यातील वाघ नसल्याने तो राज्याच्या व राष्ट्राच्या प्रश्नांवर गर्जना करीत आहे. वाघाला रोखणे किंवा गोंजारणे आता शक्य नाही,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुखपत्रातून भाजपाचा समाचार घेतला आहे.
भाजपाचे बिनपंखाचे विमान अजून उडतेच आहे. २०१९ चे चित्र पूर्ण वेगळे असेल, पण भाजपा अजूनही २०१४ च्या सुवर्णकाळात रमून बसला आहे, असे सांगतानाच भाजपाला मित्रांची गरज नाही. ते मजबूत व स्वयंभू आहेत, असा चिमटाही या मुखपत्रातून काढला आहे. शिवसेनेने सोबत असावे असे त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी उडत उडत सांगितले आहे. हा सद्विचार त्यांना २०१४ साली सुचला नाही व सत्ता मिळाल्यावरही ते विनय हरवून बसले. त्यांचे बिनपंखांचे विमान ढगात उडाले ते उडतेच आहे. आता उतरवायचे म्हटले तर त्यासाठी जमीन नाही. सुवर्णकाळातील सुवर्ण कौले फुलपूर-गोरखपूरमधून उडून गेल्यावर काही गोष्टी सुचू लागल्या. भाजपाने सुवर्णकाळाचे स्वप्न पाहावे. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असा टोमणाही ठाकरे यांनी भाजपाला मारला. मुंबईतील मेळाव्यात अमित शहांनी म्हटले होते की, भाजपाचे विरोधक हे साप, मुंगूस, कुत्री, मांजरी आहेत. एकमेकांशी वैर असलेले हे प्राणी मोदी महापुरात निभाव लागणार नाही म्हणून एकत्र आले. ‘यूपीए’ सरकारच्या काळातही यातले काही साप, कुत्री, मांजरी काँग्रेसबरोबर होते व मोदी लाट दिसताच यापैकी काही प्राणी भाजपाच्या तंबूत शिरले. त्यापैकी एक तेलगू देसम नुकताच बाहेर पडला आहे, अशी आठवणही अग्रलेखातून करून देण्यात आली आहे.
>सत्ताधाºयांचा श्रीमंती थाट
भाजपा स्थापना दिनानिमित्त मुंबईतील महामेळाव्यावरील खर्चावरही ‘सामना’तून टीका करण्यात आली. भाजपाच्या सुवर्णकाळासाठी कामाला लागा, असे आवाहन त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले आहे. अध्यक्ष महोदयांनी विचारांचे भस्म उधळले आहे. सत्ताधाºयांना साजेशा श्रीमंती थाटात भाजपाचा स्थापना दिवस झाला. राज्यात व केंद्रात सरकारे असल्याने हे होणारच, असे सांगतानाच यापूर्वी काँग्रेसची मुंबईतील अधिवेशनेही याच थाटात व्हायची, असेही या अग्रलेखातून भाजपाला सुनावण्यात आले.