शिवसेनेने नाकारले; भाजपाने स्वीकारले
By Admin | Published: January 19, 2017 02:14 AM2017-01-19T02:14:00+5:302017-01-19T02:14:00+5:30
शिवसेनेतून बाहेर पडलेल्या माजी खासदार गजानन बाबर मनसेमार्गे बुधवारी भाजपात दाखल झाले आहेत.
पिंपरी : तीन वेळा नगरसेवक, दोन वेळा आमदार, एकदा खासदारपद मिळूनही पक्षश्रेष्ठींवर गंभीर आरोप करून शिवसेनेतून बाहेर पडलेल्या माजी खासदार गजानन बाबर मनसेमार्गे बुधवारी भाजपात दाखल झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेने नाकारले आणि भाजपाने स्वीकारले, अशी चर्चा शहरातील राजकीय वर्तुळात आहे.
शहरात शिवसेनेची पहिली शाखा सुरू करण्यापासून बाबर यांना तीन वेळेस नगरसेवक, दोन वेळा आमदारकी, एकवेळा खासदारकीची संधी मिळाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील गटबाजीमुळे दोन्ही वेळा हवेली विधानसभेवर आमदारकीची संधी मिळाली. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर शहराला तीन विधानसभा मतदारसंघ मिळाले, तर मावळ आणि शिरूर असे दोन लोकसभा मतदारसंघ मिळाले. २००९च्या लोकसभा निवडणुकीत ते मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार झाले. त्या वेळी माजी महापौर आझम पानसरे यांना राष्ट्रवादीची अधिकृत उमेदवारी असताना चिंचवड विधानसभा मतदारसंघातून अकबरऐवजी बाबर असा प्रचार केला आणि बाबर विजयी झाले.
पुढे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी शिवसेनेकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, खासदारकीच्या वेळी आमदार जगताप यांनी त्यांना केलेल्या मदतीची परतफेड करण्याच्या उद्देशाने उमेदवारी मागितल्याचे शिवसेनाप्रमुखांच्या लक्षात आल्याने श्रीरंग बारणे यांना उमेदवारी मिळाली. त्या वेळी बाबर यांनी, पैसे देऊन उमेदवारी दिली. पैसे नसल्याने मला उमेदवारी नाकारली, असा आरोप पक्षनेते उद्धव ठाकरे यांच्यावर केला होता. शिवसेना सोडल्यानंतर पूर्वनियोजितपणे आमदार जगताप यांना पाठिंबा देत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत समर्थकांसह मनसेत जाहीर प्रवेश केला होता. लोकसभेनंतर बाबर दोन वर्षे शांत राहिले होते. (प्रतिनिधी)
>विरोधक आले एकत्र
हवेली विधानसभेच्या एका निवडणुकीत पानसरे आणि बाबर एकमेकांविरोधात होते. त्यानंतर २००९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा दोघे समोरासमोर आले होते. दोन्ही वेळेस राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीतील दुहीचा फटका पानसरे यांना बसला.
>भाऊ, पुतणे शिवसेनेतच
शिवसेना सोडल्यानंतर शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे बाबरांनी स्वगृही परतण्याची मानसिकता केली होती. नेते अनिल देसाई यांनी बाबर यांच्याशी चर्चाही केली होती. मात्र, स्थानिक पातळीवरील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमुळे त्यांना प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळेच भाजपाचा मार्ग स्वीकारल्याचे बाबर यांचे म्हणणे आहे. बाबर भाजपात गेले असले, तरी त्यांचे बंधू, माजी नगरसेवक प्रकाश आणि मधुकर बाबर, तसेच भावजय शारदा बाबर, पुतणे योगेश बाबर हे शिवसेनेतच आहेत.