शिवसेनेचे घूमजाव
By admin | Published: June 21, 2017 03:24 AM2017-06-21T03:24:42+5:302017-06-21T03:24:42+5:30
केवळ दलित समाजाची मते मिंळविण्यासाठी राष्ट्रपतिपदासाठी दलित चेहरा पुढे करण्यात आला असेल, तर त्यात आम्हाला रस नाही, अशा शब्दांत भाजपाला फटकारणाऱ्या उद्धव ठाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केवळ दलित समाजाची मते मिंळविण्यासाठी राष्ट्रपतिपदासाठी दलित चेहरा पुढे करण्यात आला असेल, तर त्यात आम्हाला रस नाही, अशा शब्दांत भाजपाला फटकारणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी २४ तासांत घूमजाव केले आहे. राष्ट्रपतिपदासाठीचे भाजपा उमेदवार रामनाथ कोविंद यांना शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. मंगळवारी शिवसेना नेत्यांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी ही माहिती दिली.
राष्ट्रपतिपदासाठी भाजपाने रामनाथ कोविंद यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर, शिवसेनेने याबाबत स्पष्ट भूमिका घेतली नव्हती. उलट षण्मुखानंद येथील शिवसेना वर्धापन दिनाच्या मेळाव्यात कोविंद यांच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त केली होती. दलित मतांवर डोळा ठेऊन दलित उमेदवार पुढे केला जात असल्याचे सांगत मंगळवारी शिवसेना नेत्यांच्या बैठकीनंतर निर्णय घेणार असल्याचे उद्धव यांनी मेळाव्यात सांगितले होते. त्याप्रमाणे, मंगळवारी सायंकाळी मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची बैठक झाली. त्यात कोविंद यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. कायम भाजपाला विरोध करावा, अशी काही शिवसेनेची भूमिका नाही. जे पटते, तिथे पाठिंबा देतो आणि जे पटत नाही, तिथे विरोध स्पष्टपणे करतो, असे सांगत ठाकरे यांनी सारवासारव केली. काँग्रेस व अन्य विरोधी पक्ष ज्या नावांची चर्चा करत आहेत, त्या फक्त चर्चाच आहेत. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्यात काहीही अर्थ नाही, तोवर निवडणूक होऊन जाईल, असे ते म्हणाले. रामनाथ कोविंद हे एनडीएने पुढे केलेले चांगले नाव आहे. ते देशासाठी चांगले काम करतील, देशहिताचे निर्णय घेतील, अशी आशा आम्हाला आहे. शिवसेना नेत्यांशी चर्चा करूनच आम्ही त्यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
खरे तर देशहितासाठी आम्ही मोहन भागवत यांच्या नावाला पहिली पसंती दिली होती. ही पसंती आजही कायम आहे. मात्र, ते राष्ट्रपतिपदाच्या चर्चेत नाहीत, तसेच शेतकऱ्यांचे हित व्हावे, म्हणून स्वामिनाथन यांच्या नावाला दुसरी पसंती दर्शवली होती. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत झालेल्या चर्चेत आम्ही स्वामिनाथन यांचे नावही सांगितले होते. मात्र, स्वामिनाथन यांना प्रकृतीच्या कारणास्तव उमेदवार करणे शक्य नाही, असे शहा यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भाजपाने जे तिसरे नाव जाहीर केले, त्याला आम्ही पाठिंबा दिला आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.