शाखा संपर्क अभियान; प्रश्न तुमचे, उत्तर शिवसेनेचे, मुख्यमंत्र्यांचा थेट संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 05:50 AM2023-07-10T05:50:00+5:302023-07-10T05:50:39+5:30
अनेक घटनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फोनवरून थेट चर्चा करताना दिसून येत आहेत. त्यामुळे सध्या त्यांचे हे थेट ऑनलाइन बोलणे चर्चेत आहे.
प्रश्न तुमचे, उत्तर शिवसेनेचे... अशी हाक देत शिवसेनेकडून शाखा संपर्क अभियान राबविले जात आहे. यांची धुरा खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर आहे. त्यामुळे जेथे जेथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पोहोचता येत नाही. तेथे सर्वात प्रथम खा. शिंदे पोहोचतात. लोकांशी चर्चा करतात. या चर्चेत कार्यकर्ते, नागरिकांकडून तक्रारींचा पाढा वाचला जातो. जेथे निर्णय देणे शक्य आहे. तेथे श्रीकांत शिंदे कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतात. मात्र परिस्थिती कठीण असल्याचे दिसताच मुख्यमंत्र्यांना फोन लावतात. अनेक घटनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फोनवरून थेट चर्चा करताना दिसून येत आहेत. त्यामुळे सध्या त्यांचे हे थेट ऑनलाइन बोलणे चर्चेत आहे.
पाण्यावरून दिवा पेटतोय!
भरपावसातही तीव्र पाणीटंचाई दिव्यातील रहिवाशांची पाठ सोडत नाही. नवसाला पुजलेल्या या दिवेकरांच्या पाणीटंचाईवर मात करणारी २२१ कोटींच्या पाइपलाइनचे पाणी मुरतंय कुठे, याचा शोध स्थानिक राजकारण्यांकडून विशेषत: भाजपकडून घेतला जात असल्याने दिव्यातील रहिवाशांमध्ये तर्कवितर्क काढले जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अलीकडेच विविध विकासकामांसह या पाइपलाइनच्या कामाचा ऊहापोह झाला. पण आता त्यांच्याच मित्र भाजपच्या राजकीय गोटातून या २२१ कोटींच्या पाइपलाइनवरून भ्रष्टाचाराचे ताशेरे ओढले जात आहेत. ऐन पावसाळ्यातही दिव्यातील रहिवाशांना तीन-तीन दिवस पाण्याची वाट पाहावी लागत आहे. शेकडो कोटींच्या खर्चातूनही दिव्याला मुबलक पाणीपुरवठा नाही. या गंभीर समस्येला भ्रष्टाचाराच्या रंजक चर्चेची झालर राजकीय वर्तुळात सध्या झळाळत आहे.