Sanjay Raut: शिवसेनेला आव्हान देण्याची औलाद जन्माला यायचीय; संजय राऊतांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 08:13 PM2022-06-08T20:13:19+5:302022-06-08T20:17:40+5:30
पुढची अनेक वर्ष महाराष्ट्रावर भगवाच झेंडा फडकत राहील. ही गर्दी नव्हे शक्ती आहे. आमच्या वाटेला जाऊ नका, आमचा नाद करू नका असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
औरंगाबाद - मराठवाड्यात शिवसेनेची ही जाहीर सभा होतेय. ही गर्दी नव्हे तर शक्ती आहे. याच मैदानावर काही दिवसांपूर्वी सभा घेऊन शिवसेनेला आव्हान देण्याची भाषा केली गेली. परंतु मराठवाड्यात शिवसेनेला आव्हान देण्याची औलाद अजून जन्माला यायची आहे अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.
संजय राऊत(Sanjay Raut) म्हणाले की, व्यासपीठावर आणि व्यासपीठासमोर जे आहेत ते शिवसेनेचे वाघ आहेत आणि या वाघाचा बाप उद्धव ठाकरे आहेत. खूप महिन्याने अतिविराट सभा मराठवाड्यात होतेय. ३७ वर्षापूर्वी मराठवाड्यात पहिली शाखा स्थापना झाली. त्याचा वर्धापन दिन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या हस्ते साजरा होतेय हे भाग्याचा क्षण आहे. गर्दी म्हणजे समुद्राच्या लाटा उसळल्या आहेत. या लाटेचा तडाखा भाजपाला बसला तर पाणी मागायला उठणार नाहीत. अनेक महिन्यांनी मुंबईच्या बाहेर उद्धव ठाकरेंची सभा विराट सभा होतेय. ही सभा दिल्लीच्या तख्तालाही हादरे दिल्याशिवाय राहणार नाही.
याच मैदानात काही जणांनी आव्हान देण्याचा प्रयत्न केला. परंतु मराठवाड्यात शिवसेनेला आव्हान देण्याची औलाद जन्माला यायची आहे. हा मराठवाडा ज्याने औरंगजेबाला या मातीला गाडलं. निजामाला पळवून लावलं. ही शिवसेना निजामाच्या बापाच्या छातीवर पाय रोवून महाराष्ट्रात सत्तेत आली आहे. पुढची अनेक वर्ष महाराष्ट्रावर भगवाच झेंडा फडकत राहील. ही गर्दी नव्हे शक्ती आहे. आमच्या वाटेला जाऊ नका, आमचा नाद करू नका. सातत्याने शिवसेनेवर हल्ले केले जात आहे. संभाजीनगरात आक्रोश मोर्चा काढला गेला. आक्रोश पाहायचा असेल भाजपाच्या नामर्द लोकांनी काश्मीरला पंडितांवर होणारे अत्याचार पाहावेत. रोज हिंदूंवर भ्याडहल्ले होत आहेत. हे सरकार नामर्दासारखं हातावर हात ठेऊन बसले आहे. हिंदुत्व आम्हाला शिकवता? दिवसा-ढवळ्या त्यांना मारलं जातंय. संपूर्ण काश्मीर खोरे आणि पंडित उद्धव ठाकरेंकडे मोठ्या आशेने पाहत आहेत असं संजय राऊतांनी म्हटलं.
दरम्यान, काश्मीर पंडितांना आधार द्यायचं काम हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी पहिल्यांदा केले. उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्या रक्षणासाठी पुढे आहेत. प्राण जाईल पण वचन जाणार नाही. उठसूठ शिवसेनेवर हल्ले केले जात आहेत. त्या हल्ल्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी शिवसेना समर्थ आहे. महागाई वाढली. पेट्रोल डिझेलचे दर वाढले त्यावर प्रश्न विचारले तर ज्ञानवापी, ताज महाल असे प्रश्न पुढे आणत आहेत. कैलास मानसरोवर चीनच्या ताब्यात आहे. तेथील शिवलिंग भारतात आणा. परंतु एवढी हिंमत त्यांच्यात नाही. ठाकरे सरकारने देशाला दिशा दिली. फक्त महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देश उद्धव ठाकरेंकडे अपेक्षेने पाहतोय असं संजय राऊत यांनी सांगितले.