"केंद्रीय यंत्रणेला राज्यात घुसवून मुंबई पोलिसांचं खच्चीकरण करण्याचा, राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 12:14 PM2021-03-14T12:14:28+5:302021-03-14T12:31:22+5:30

Shivsena Sanjay Raut And Sachin Vaze Arrested : "मुंबई पोलिसांच्या क्षमतेवर हा हल्ला करण्याचा प्रयत्न आहे. मुंबई पोलिसांची क्षमता जगाला माहिती आहे."

Shivsena Sanjay Raut reaction Over Sachin Vaze Arrested and mumbai police | "केंद्रीय यंत्रणेला राज्यात घुसवून मुंबई पोलिसांचं खच्चीकरण करण्याचा, राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न"

"केंद्रीय यंत्रणेला राज्यात घुसवून मुंबई पोलिसांचं खच्चीकरण करण्याचा, राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न"

Next

मुंबई - प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके सापडल्याप्रकरणी एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) यांना तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एनआयएने अटक केली आहे. एनआयएकडून  सचिन वाझे यांना शनिवारी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी अटक केल्याची माहिती देण्यात आली आहे. याच दरम्यान शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "केंद्रीय यंत्रणेला राज्यात घुसवून मुंबई पोलिसांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न" सुरू असल्याचं म्हणत संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. तसेच राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न असल्याचं देखील राऊत यांनी म्हटलं आहे. 

संजय राऊत यांनी "मुंबई पोलिसांच्या क्षमतेवर हा हल्ला करण्याचा प्रयत्न आहे. मुंबई पोलिसांची क्षमता जगाला माहिती आहे. मुंबई पोलीस कोणाच्याही दबावाखाली येत नाहीत पण राज्यात घुसायचं, राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न करायचा, केंद्राचा दबाव आणि दहशत आहे हे दाखवायचं अशा पद्धतीने कारवाई करण्यात आली आहे. हे सगळं राजकारण सुरू आहे. सचिन वाझेंना अटक झाली आहे. योग्य ती प्रक्रिया सुरू होईल. यावर मी बोलणार नाही. आरोप ठेवणं आणि प्रत्यक्षात आरोप सिद्ध होणं यामध्ये खूप मोठं अंतर आहे. या संपूर्ण प्रकरणात महाराष्ट्र सरकारची प्रतिष्ठा पणाला लागली आहे" असं म्हटलं आहे. 

"लोक तुमची प्रतिमा उद्ध्वस्त करू शकतात, तुमच्या व्यक्तिमत्वाला डाग लावू शकतात पण..."

वाझेंच्या अटकेनंतर संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. तुम्हाला ओळखणारे तुमचा आदर्श कायम ठेवतील असं राऊत यांनी म्हटलं आहे. "लोक तुमची प्रतिमा उद्ध्वस्त करू शकतात. तुमच्या व्यक्तिमत्वाला डाग लावू शकतात. पण तुम्ही केलेलं चांगल काम ते हिरावून घेऊ शकत नाही. तुमचं वर्णन त्यांनी कसंही केलं, तरी तुम्हाला ओळखणारे तुमचा आदर्श कायम ठेवतील" असं संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. वाझे काल सकाळी 11 वाजताच एनआयएच्या कार्यालयात हजर झाले होते, तेव्हापासून त्यांची चौकशी सुरू होती. जवळपास 13 तासांच्या चौकशीअंती एनआयएने त्यांना अटक केली. यानंतर आता भाजपा आक्रमक झाला असून त्यांनी ठाकरे सरकार निशाणा साधला आहे. 

"सचिन वाझेंची ताबडतोब नार्को टेस्ट करा, शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारचा खरा चेहरा समोर येईल"

सचिन वाझे यांची ताबडतोब नार्को टेस्ट केली जावी, अशी मागणी भाजपाचे नेते राम कदम (Ram Kadam) यांनी केली आहे. राम कदम यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला असून आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट केले आहेत. "अनिल देशमुखजी सचिन वाझे यांची ताबडतोब नार्को टेस्ट करा. होऊन जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी" असं कदम यांनी म्हटलं आहे. तसेच "अशी कोणती नावं आहेत ज्यांना महाराष्ट्र सरकार वाचवू पाहत आहे?, नार्को टेस्ट करण्यात यावी जेणेकरून शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर येईल" असं देखील त्यांनी म्हटलं आहे. 

 

Web Title: Shivsena Sanjay Raut reaction Over Sachin Vaze Arrested and mumbai police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.