Sanjay Shirsat : "काहीच माहीत नव्हतं, अंगावरच्या कपड्यानीशी गेलो अन्..."; संजय शिरसाटांनी सांगितला 'तो' किस्सा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2022 10:34 AM2022-07-08T10:34:09+5:302022-07-08T10:50:26+5:30

Shivsena Sanjay Shirsat : राज्यात भाजपा आणि शिवसेनेचं नवीन सरकार स्थापन करण्याआधी बंडखोर आमदार हे सूरतला गेले होते. त्यावेळी नेमकं काय घडलं? याबाबत आता आमदार खुलासा करत आहेत.

Shivsena Sanjay Shirsat reavels went surat without luggage and extra clothes | Sanjay Shirsat : "काहीच माहीत नव्हतं, अंगावरच्या कपड्यानीशी गेलो अन्..."; संजय शिरसाटांनी सांगितला 'तो' किस्सा

Sanjay Shirsat : "काहीच माहीत नव्हतं, अंगावरच्या कपड्यानीशी गेलो अन्..."; संजय शिरसाटांनी सांगितला 'तो' किस्सा

googlenewsNext

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. राज्यात भाजपा आणि शिवसेनेचं नवीन सरकार स्थापन करण्याआधी बंडखोर आमदार हे सूरतला गेले होते. त्यावेळी नेमकं काय घडलं? याबाबत आता आमदार खुलासा करत आहेत. शिंदे गटातील शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट (Shivsena Sanjay Shirsat) यांनी सूरतला गेलो होतो तेव्हा आमच्यातील अनेकांकडे सामान किंवा कपडे देखील नव्हते असं म्हटलं आहे. इतकंच काय तर आपण नेमकं कुठे चाललो आहोत याची देखील कल्पनाही नव्हती असंही सांगितलं आहे. 

"एकनाथ शिंदे हे आम्हाला चला म्हटले म्हणून आम्ही निघालो. आमच्याकडे गरजेपुरते कपडेही नव्हते. अंगावरच्या कपड्यानीशी आम्ही आलो होतो. जेव्हा आम्ही एकनाथ शिंदेंना याबाबत सांगितलं तेव्हा अक्षरश: हॉटेलमध्येच कपड्याचं दुकान सुरू करण्यात आलं. त्यानंतर आम्हाला नवीन कपडे मिळाले" अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली. आमदारांनी एकनाथ शिंदेंना आपल्या अडचणी सांगितल्या आणि सर्व काही सुरळीत झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. माध्यमांनी प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

"कपड्यांबद्दल सांगितल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कपड्यांनी भरलेल्या गाड्याच हॉटेलमध्ये आल्या. जणू काही हॉटेलमध्ये कपड्याचं दुकानच सुरू केलं होतं. यानंतर प्रत्येकाने आपल्या आवडीने कपडे घेतले. फक्त कपडेच नाही तर बूट आणि इतर गरजेचं सामानही उपलब्ध करुन देण्यात आलं" असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. शिरसाट हे औरंगाबाद विमानतळावर येताच त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. मतदारसंघात कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं. भरपावसात आमचे कार्यकर्ते आम्हाला नेण्यासाठी, स्वागतासाठी आल्याचे सांगत त्यांनी आम्ही आजही शिवसैनिकच असल्याचं म्हटलं. 

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वातील हा उठाव शिवसेना वाचविण्यासाठी होता, आम्हीच त्यांना हा बंड करायला लावलं, असेही ते म्हणाले. यावेळी, त्यांनी पक्षनेतृत्त्वार आणि त्यांच्याजवळील काही लोकांचा चांडाळ चौकटी म्हणत चांगलाच समाचार घेतला. तर, औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यावरही निशाणा साधला. माझ्या पालकमंत्र्यांनी गेल्या अडीच वर्षात मला एक फोन नाही केला. माझ्या मतदारसंघात सोडा, पण माझ्या घराच्या बाजुला पालकमंत्री येतात आणि मला माहितीही होत नाही. माझ्या मतदारसंघासाठी 1 कोटीचा निधी आणि शेजारी गंगापूर मतदारसंघात 11 कोटींचा निधी मिळतो, हे कसं, असा सवालही संजय शिरसाट यांनी औरंगाबादेत असताना उपस्थित केला. तसेच, हे मी तोंडी बोलत नसून रेकॉर्डवर आहे सगळं, असेही ते म्हणाले. 

Read in English

Web Title: Shivsena Sanjay Shirsat reavels went surat without luggage and extra clothes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.