Santosh Bangar : "...तर संतोष बांगरचं नाव बदलायचं"; शिंदे समर्थक आमदाराने स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 01:47 PM2022-08-08T13:47:21+5:302022-08-08T14:44:05+5:30

Shivsena Santosh Bangar : एकनाथ शिंदे नांदेड आणि हिंगोलीच्या दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. हिंगोलीत आमदार संतोष बांगर यांनी शिंदे यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी केली आहे.

Shivsena Santosh Bangar Say 50 thousand shiva devotee will involve in kawad yatra | Santosh Bangar : "...तर संतोष बांगरचं नाव बदलायचं"; शिंदे समर्थक आमदाराने स्पष्टच सांगितलं

Santosh Bangar : "...तर संतोष बांगरचं नाव बदलायचं"; शिंदे समर्थक आमदाराने स्पष्टच सांगितलं

googlenewsNext

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचे तब्बल ४० आमदार आणि १२ खासदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटात सर्वात शेवटी सहभागी होणारे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांचाही समावेश आहे. बांगर यांनी विधानसभेत अध्यक्षपदावेळी शिवसेनेच्या बाजूने मतदान केले. परंतु विश्वासदर्शक ठरावावेळी बांगर थेट शिंदे गटात सहभागी झाल्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. यानंतर आता संतोष बांगर यांनी एक मोठं विधान केलं आहे. 

"50 हजार शिवभक्त सहभागी झाले नाहीत तर संतोष बांगरचं नाव बदलायचं" असं म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नांदेड आणि हिंगोलीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. हिंगोलीत देखील आमदार संतोष बांगर यांनी शिंदे यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी केली आहे. आज हिंगोलीत महादेवाची कावड यात्रा आहे. यात्रेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजेरी लावणार असल्याचं म्हटलं जात आहे. या यात्रेत हजारो शिवभक्त हे सहभागी होणार आहेत. 

हजारो शिवभक्त कळमनुरी येथील चिंचाळेश्वर महादेव मंदिरापर्यंत पोहोचतील. तेथून हिंगोलीच्या दिशेने पदयात्रा निघणार असल्याचं संतोष बांगर यांनी सांगितलं. "कावड यात्रेसाठी 75 ट्रक उभे आहेत. एका ट्रकमध्ये 200 जण. अनेक चार चाकीही उभ्या आहेत. यातील एकूण शिवभक्तांची संख्या ही 50 हजारांच्या घरात असेल. मला राजकारणाविषयी काही बोलायचं नाही. जे कोणी बोलतील त्याची पर्वा नाही. 50 हजारांहून कमी शिवभक्त दिसले नाहीत तर संतोष बांगर हे नाव बदलायचं" असं बांगर यांनी म्हटलं आहे. 

"हे शक्तिप्रदर्शन नाही... शिवसेनेची ताकद आणि शिवाची ताकद आज दिसून येईल" असंही सांगितलं. प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी "बबन थोरातला पुरून उरू, आमच्या गाड्या तुमच्या घरासमोर आणून उभ्या करू. आमच्या गाडीला टच जरी करुन दाखवलं तर हाच संतोष बांगर शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्याशिवाय राहणार नाही" अशा शब्दात कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी शिवसेना संपर्कप्रमुख बबन थोरात यांच्या आव्हानाला प्रतिआव्हान दिलं होतं. 
 

Web Title: Shivsena Santosh Bangar Say 50 thousand shiva devotee will involve in kawad yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.