शिवसेनेनं असं वागायला नको होतं; श्रीनिवास वनगा यांच्या उमेदवारीवरून CMनं खेचले कान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2018 05:25 PM2018-05-08T17:25:09+5:302018-05-08T17:54:16+5:30
शिवसेनेनं पालघर पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी आणि भाजपा उमेदवाराच्या पाठीशी उभं राहावं.
मुंबईः पालघर लोकसभेची जागा भाजपाची होती आणि आहे. दिवंगत खासदार चिंतामण वनगांच्या मुलाला - श्रीनिवास वनगा यांनाच आम्हीही उमेदवारी देणार होतो. हे ठाऊक असतानाही शिवसेनेनं त्यांना पक्षात घेऊन तिकीट देणं दुर्दैवी आहे. त्यांनी असं वागायला नको होतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेना नेतृत्वाचे कान खेचले आहेत.
शिवसेनेनं अजूनही पालघर पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी आणि भाजपा उमेदवाराच्या पाठीशी उभं राहावं, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली. तसंच, पालघरमध्ये भाजपा हरल्यास चिंतामण वनगा यांना वाईट वाटेल, ती त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरणार नाही, अशी भावनिक सादही मुख्यमंत्र्यांनी घातली. पालघर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. पालघर पोटनिवडणुकीसाठी उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची शिफारस भाजपाच्या केंद्रीय संसदीय मंडळाला करण्यात आली असून त्यांचं तिकीट 'कन्फर्म'च मानलं जातंय.
गावित यांच्या पक्षप्रवेशानंतर पत्रकारांशी बोलताना, मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेचा समाचार घेतला. पालघरची पोटनिवडणूक जाहीर झाली तेव्हाच, श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी द्यायचं आमचं पक्कं ठरलं होतं. स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करायलाही नेते गेले होते. तिथेही, वनगा यांच्या कुटुंबीयांनाच तिकीट देण्याचं सर्वांचं मत पडलं होतं. याची कल्पना असताना आणि ही जागा भाजपाची आहे हेही माहीत असताना, शिवसेना जे वागली ते दुर्दैवीच आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली. शिवसेनेनं स्वबळाचा नारा दिला आहे, याकडे लक्ष वेधलं असता, तो २०१९साठी आहे आणि आत्ता २०१८ सुरू आहे, असं ते म्हणाले. मुंबई महापालिकेच्या पोटनिवडणुकीत भाजपाने शिवसेनेला पाठिंबा दिल्याची आठवणही मुख्यमंत्र्यांनी करून दिली. पालघर पोटनिवडणुकीतही शिवसेनेनं भाजपासोबत राहावं, श्रीनिवास वनगा यांचं योग्य पुनर्वसन केलं जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.