"शिवप्रेमाचे नवे ढोंग! भाजपा हा किती तोंडी नाग?"; सामनातून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 09:11 AM2022-12-03T09:11:22+5:302022-12-03T09:12:44+5:30

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून सामनातून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.

Shivsena slams BJP Over chhatrapati shivaji maharaj and maharashtra politics | "शिवप्रेमाचे नवे ढोंग! भाजपा हा किती तोंडी नाग?"; सामनातून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र

"शिवप्रेमाचे नवे ढोंग! भाजपा हा किती तोंडी नाग?"; सामनातून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र

googlenewsNext

"भारतीय जनता पक्ष हा नक्की किती तोंडी नाग आहे? छत्रपतींचा अपमान महाराष्ट्राच्या राज्यपालांनी करूनही त्यांच्या धमन्या थंडच आहेत व ज्यांनी उसळून तलवार काढली आहे त्यांच्यावर हल्ले सुरू केले  भाजपचे शिवराय प्रेम हे ढोंग असल्याचे सिद्ध होते" असं म्हणत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून सामनातून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. छत्रपतींचा अपमान राज्यपाल कोश्यारी, राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी व राज्याचे पर्यटनमंत्री लोढा यांनी केला. यावरून पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. तसेच विखे पाटलांवर देखील निशाणा साधण्यात आला आहे. 

"महाराष्ट्राच्या राज्यपालांपासून मंत्र्या-संत्र्यांपर्यंत प्रत्येकजण स्वतःस महामहोपाध्याय किंवा शिवशाहीर असल्याच्या आविर्भावात डफावर थाप मारीत आहे, पण ही लोणकढी थापच म्हणावी लागेल! विखे पाटील हे कधीकाळी मर्दमऱ्हाठे मावळे म्हणून शिवरायांचे भक्त होते. आज भाजपात जाऊन त्यांना शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांचे गुणगान करावे लागते. वीर मराठय़ांचा हा देश आहे या कल्पनेस यामुळे धक्का बसतो. एकंदरीत भाजपचे शिवप्रेमाचे ढोंग रोज उघडे पडत आहे. त्यामुळे छत्रपती उदयन राजे म्हणतात तेच खरे की, 'छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे सत्तेवर कसे राहू शकतात?' हा निर्लजपणाच आहे!" असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे, 

सामनाचा आजचा अग्रलेख

- भारतीय जनता पक्ष हा नक्की किती तोंडी नाग आहे? त्यावर नव्याने संशोधन करायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमान प्रश्नी भाजप नेमके हेच करीत आहे. छत्रपतींचा अपमान महाराष्ट्राच्या राज्यपालांनी करूनही त्यांच्या धमन्या थंडच आहेत व ज्यांनी उसळून तलवार काढली आहे त्यांच्यावर हल्ले सुरू केले. महसूलमंत्री विखे पाटील यांनी राज्यपालांचा बचाव केला. कोश्यारींविरोधात लोकभावना भडकविण्याचा विरोधकांचा डाव असल्याचे विखे पाटलांनी सांगितले. विखेंनी असे बोलणे हा महाराष्ट्राच्या लोकभावनेचाही अपमान आहे. 

- सातारचे छत्रपती उदयनराजे भोसले यांनी खवळून सांगितले, 'छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे सत्तेवर राहतात हा निर्लज्जपणा आहे.' यावर विखे पाटील वगैरे लोकांचे काय म्हणणे आहे? राज्यपालांविरुद्ध लोकभावना भडकलेल्याच आहेत. त्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज नाही, पण दुःख हे की, महाराष्ट्राचे वरिष्ठ मंत्री अपमानाचे समर्थन करीत आहेत. 

- गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी यांची तुलना शंभर तोंडांच्या रावणाशी करताच मोदी व त्यांच्या लोकांनी लगेच काँग्रेस व खरगेंवर प्रतिहल्ले सुरू केले. मोदींना रावणाची उपमा देणे हा गुजरातचा व गुजरातच्या सुपुत्राचा अपमान असल्याचे जाहीर सभांतून ढोल-नगारे वाजवून सांगण्यात येत आहे. गुजराती जनतेने मोदींच्या अपमानाचा बदला घेतला पाहिजे असे मोदी सांगू लागले. 

- पंतप्रधानांचा अपमान करणे हे चूकच आहे. मात्र जर मोदींना रावण म्हटल्याने गुजराती अस्मितेचा अपमान ठरत असेल तर छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना 'भाजप' पाठीशी घालते, त्यांचा बचाव करते यास काय म्हणावे? मोदींना रावण म्हटल्याने गुजरातच्या लोकभावना भडकू लागल्या, पण छत्रपतींच्या अपमानानंतर मराठी जनता भडकताच हा म्हणे विरोधकांचा डाव आहे, असे भाजप सांगत आहे. यावरून भाजपचे शिवराय प्रेम हे ढोंग असल्याचे सिद्ध होते. 

- छत्रपतींचा अपमान राज्यपाल कोश्यारी, राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी व राज्याचे पर्यटनमंत्री लोढा यांनी केला. लोढा हे बिल्डर आहेत व त्यांनी बांधलेल्या गृहसंकुलात मांसाहार करणाऱ्यांना प्रवेश नाकारला गेल्याचे प्रकरण गाजले होते. आताही तीच परिस्थिती आहे. इतिहास काळात लोढा हे बिल्डर असते व छत्रपतींच्या मावळय़ांनी, सरदारांनी त्यांच्या गृहसंकुलात प्रवेश केला असता तर त्यांची काय भूमिका असती? कारण मावळे हे तसे मांसाहारीच होते व आहेत. 

- वेडात दौडलेल्या सात मराठी वीरांवरच आक्षेप घेतल्याने आता नवा इतिहास लिहावा लागतो की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवरायांचा इतिहास हा प्रेरणादायी आहे व त्यातूनच महाराष्ट्रात शौर्याची बीजे रोवली गेली. स्वराज्याची गरज होती म्हणून महाराजांनी अफझल खानाचा कोथळा काढला. शाहिस्ते खानाची बोटे छाटली. स्वराज्याचा लढा साधा नव्हता. ते एक महान शौर्य होते. चारशे वर्षांनंतर त्या इतिहासावर संशोधन करून आता काय साध्य होणार? 

- आधीच शालेय क्रमिक पुस्तकांतून खरा इतिहास हद्दपार झाला. तेथेच मऱहाठी मनगटे थंड पडली. त्यात आता महाराष्ट्राच्या राज्यपालांपासून मंत्र्या-संत्र्यांपर्यंत प्रत्येकजण स्वतःस महामहोपाध्याय किंवा शिवशाहीर असल्याच्या आविर्भावात डफावर थाप मारीत आहे, पण ही लोणकढी थापच म्हणावी लागेल! 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Shivsena slams BJP Over chhatrapati shivaji maharaj and maharashtra politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.