दिल्लीत 'आप'मतलब्यांचा पराभव, सामनातून 'भाजपा'वर टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 08:42 AM2020-02-12T08:42:49+5:302020-02-12T12:06:41+5:30
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातूनही केजरीवाल यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
मुंबई - दिल्ली विधानसभेच्या निकालात पुन्हा एकदा दिल्लीकरांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर विश्वास ठेवला आहे. 2015 च्या निकालाची पुनरावृत्ती करत आपच्या पारड्यात 62 जागा टाकल्या आहेत. तर भाजपाला 8 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीतही भोपळा फोडता आला नाही. या निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच स्तरातून अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन होत आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातूनही केजरीवाल यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. तसेच दिल्लीत 'आप'मतलब्यांचा पराभव झाला असं म्हणत भाजपावर निशाणा साधण्यात आला आहे.
'केजरीवाल यांनी केलेल्या कामांच्या जोरावर सत्ता पुन्हा मिळवली हे मान्य केले पाहिजे. त्यांनी लोकांना गंडवले नाही व जे केले त्यावरच मते मागितली. अहंकार, मस्तवालपणा आणि 'हम करे सो कायदा' या वृत्तीचा हा पराभव आहे' असं म्हणत सामनातून भाजपावर जोरदार टीका करण्यात आली आहे. 'भाजपा हिंदू-मुसलमान, पाकिस्तान वगैरे बोंबलत बसले. पण शेवटी विजय केजरीवाल यांच्या 'आप'चा झाला. 'आपमतलब्यां'चा पराभव झाला. केजरीवाल यांच्या झाडूने सगळय़ांना साफ केलं. केजरीवाल यांचे अभिनंदन!' असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
सामनाचा आजचा अग्रलेख
- दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप'चा विजय झाला यात आश्चर्य वाटावे असे काहीच नाही. पंतप्रधान मोदी यांच्यापेक्षाही दिल्लीची निवडणूक गृहमंत्री अमित शहा यांनी प्रतिष्ठेची केली होती. जयप्रकाश नड्डा यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली, पण दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचे सूत्रधार अमित शहा हेच होते. पक्षाचे अध्यक्षपद सोडताना त्यांना एक विजय मिळवायचा होता. ते शक्य झाले नाही.
- झारखंडमध्ये पराभव झाला व ध्यानीमनी नसताना महाराष्ट्रासारखे महत्त्वाचे राज्य हातचे गेले. देशाच्या राजधानीवर 'आप'चा झेंडा फडकला, तर आर्थिक राजधानीवर शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्य करीत आहे. हा बाण काळजात आरपार खुपणारा आहे. लोकसभा निवडणुकीतील मोठय़ा विजयानंतर भाजपला एकापाठोपाठ एक राज्ये गमवावी लागली आहेत.
- चार महिन्यांपूर्वी दिल्लीतील सातपैकी सात लोकसभा जागांवर भाजपचा विजय झाला तो पंतप्रधान मोदी यांचा करिश्मा होता. मोदी किंवा भाजपसमोर एखाद्या पक्षाचे किंवा नेत्याचे तगडे आव्हान नव्हते. त्यामुळे भाजपचा एकतर्फी विजय झाला, पण विधानसभा निवडणुकीत एकीकडे राज्यांतील तगडे नेतृत्व आणि त्यांच्यासमोर मोदी आणि शहांची 'हवाबाज' नीती फोल असे चित्र निर्माण झाले आहे.
- दिल्ली विधानसभेचा निकाल पाहिला तर एकटे केजरीवाल हे संपूर्ण केंद्र सरकार व शक्तिमान भाजपला भारी पडले आहेत. केजरीवाल यांच्या पराभवासाठी भाजपने देशभरातील अडीचशे खासदार, दोन-चारशे आमदार, मुख्यमंत्री तसेच राज्यांचे मंत्री व संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ मैदानात उतरवले होते, पण त्या सर्व फौजांचे शेवटी दिल्लीच्या मैदानावर साफ पानिपत झाले. अहंकार, मस्तवालपणा आणि 'हम करे सो कायदा' या वृत्तीचा हा पराभव आहे.
- दिल्लीच्या विधानसभेत कोणत्या प्रश्नांवर निवडणुका लढवाव्यात यावर भाजपात नेहमीप्रमाणे गोंधळ उडाला. नेहमीप्रमाणे येथेही हिंदू-मुसलमान, राष्ट्रवाद आणि देशद्रोह याच विषयांवर भारतीय जनता पक्षाने प्रचार केला व मते मागितली, पण दिल्लीतील सर्वच थरांतील मतदारांनी हे सर्व विषय ठोकरून लावले व केजरीवाल यांनी पाच वर्षांत जे काम केले त्यावरच मतदान केले. केजरीवाल यांनी पाच वर्षांत केलेल्या कामांवर मते मागितली. असे आपल्या निवडणुकीत सहसा घडत नाही. भावनिक आणि धार्मिक मुद्दय़ांवरच भर दिला जातो.
- भारतीय जनता पक्षाने नेहमीप्रमाणे दिल्लीत तेच केले. नागरिकता सुधारणा कायदा, एनआरसी या मुद्दय़ांवर वातावरण तापवले. सीएए म्हणजे नागरिकता सुधारणा कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या शाहीन बाग परिसरात आंदोलक बसले व हे फक्त मुसलमानांचे आंदोलन आहे असा प्रचार करून मते मिळवण्याचा प्रयत्न झाला. तो फारसा यशस्वी झाला नाही.
- दिल्लीकरांनी 'आप'च्याच पारडय़ात विजयाचे दान टाकले. विधानसभेच्या 70 पैकी तब्बल 60च्या वर जागा आपने जिंकल्या. गेल्या वेळेपेक्षा यावेळी भाजपच्या जागा वाढल्या. मतांची टक्केवारीही थोडी वाढली आणि काँग्रेसची मते मोठ्या प्रमाणात घसरून त्यांना पुन्हा भोपळाही फोडता आला नाही, हे भाजपसाठी कदाचित 'दिलासादायक' असू शकते, परंतु शेवटी केजरीवाल आणि त्यांनी पाच वर्षांत केलेली कामे कथित राष्ट्रवाद, हिंदू-मुसलमान ध्रुवीकरण यांच्या जुमलेबाजीपेक्षा सरस ठरली.
- केजरीवाल यांनी केलेल्या कामांच्या जोरावर सत्ता पुन्हा मिळवली हे मान्य केले पाहिजे. त्यांनी लोकांना गंडवले नाही व जे केले त्यावरच मते मागितली. केजरीवाल यांनी दिल्लीतील शाळांवर मोठे काम केले. सरकारी शाळांचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तराचा केला. या शाळा, त्यांची शिक्षण पद्धती जगात आदर्श ठरली. केजरीवाल यांनी आरोग्य व्यवस्थेत मोठी सुधारणा केली. त्यांच्या मोहल्ला क्लिनिक योजनेचा लाभ गोरगरीबांना मिळाला. भ्रष्टाचार शून्यावर आला.
- केजरीवाल यांचा दिल्ली प्रदेश हा केंद्रशासित असल्याने कायदा सुव्यवस्था, पोलीस, उद्योग हे विषय त्यांच्या अखत्यारीत येत नाहीत. त्याचा त्यांना फायदाच झाला. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचे साफ बारा वाजले व त्याचे खापर मोदी-शहांवर फोडण्यात ते यशस्वी झाले, पण पाणी आणि वीज बिल माफीचे संपूर्ण श्रेय त्यांनी घेतले.
- भाजप हिंदू-मुसलमान, पाकिस्तान वगैरे बोंबलत बसले. ''केजरीवाल हे एक नंबरचे आतंकवादी आहेत'' असे भाजपने जाहीर केले, पण शेवटी विजय केजरीवाल यांच्या 'आप'चा झाला. 'आपमतलब्यां'चा पराभव झाला. केजरीवाल यांच्या झाडूने सगळय़ांना साफ केले. केजरीवाल यांचे अभिनंदन!
महत्त्वाच्या बातम्या
Delhi Election: दिल्लीत आम आदमीचेच राज्य!
Delhi Election : आपच्या आमदारावर जीवघेणा हल्ला; कार्यकर्त्याचा मृत्यू
Delhi Election: केजरीवालांच्या प्रतिमासंवर्धनाची यशस्वी कहाणी
Delhi Election: विरोधकांना नवचैतन्य ही भाजपसाठी धोक्याची घंटा