"मुंडे भगिनींवर नक्की कोणाचा राग आहे? हा राग मुंडे भगिनींवर आहे की गोपीनाथ मुंडेंवर?"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 09:01 AM2022-06-09T09:01:06+5:302022-06-09T09:06:50+5:30
"महाराष्ट्रात काहीच सुरळीत घडू द्यायचे नाही असेच त्यांचे प्रयत्न आहेत. सुरळीत चाललेले त्यांना पाहवत नाही. अर्थात महाविकास आघाडीचे नेतृत्वही काही लेचेपेचे नाही व भाजपचे पेच – डावपेच त्यांच्यावरच उलटविल्याशिवाय ते राहणार नाहीत."
मुंबई - राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीची चुरस सुरू आहे. येत्या 10 जून रोजी राज्यसभा निवडणूक होत आहे. त्यानंतर 20 जून रोजी राज्यातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणुक होईल. यासाठी भाजपने आपल्या 5 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपकडून यंदा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे राज्य सरचिटणीस श्रीकांत भारतीय, माजी मंत्री राम शिंदे, महिला आघाडीच्या अध्यक्षा उमा खरे आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांना यावेळी विधान परिषदेवर संधी मिळेल अशा चर्चा सुरू होत्या. परंतु त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. यावरून सामना अग्रलेखात भाष्य करण्यात आलं आहे.
"मुंडे भगिनींवर नक्की कोणाचा राग आहे? हा राग मुंडे भगिनींवर आहे की गोपीनाथ मुंडेंवर?" असा सवाल आता शिवसेनेने विचारला आहे. तसेच "महाराष्ट्राच्या भाजपामधून मुंडे-महाजनांचे नामोनिशाण मिटवायचेच या ईर्षेनेच मुंडे भगिनींचे राजकीय पतन सुरू झाले आहे" असंही म्हटलं आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात "पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा डावलण्यात आले. पंकजा मुंडे यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी खूप प्रयत्न केले, पण यश आले नाही, असा खुलासा चंद्रकांत पाटील यांना करावा लागला. मुंडे भगिनींवर नक्की कोणाचा राग आहे? हा राग मुंडे भगिनींवर आहे की गोपीनाथ मुंडेंवर? याचा शोध घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या भाजपामधून मुंडे-महाजनांचे नामोनिशाण मिटवायचेच या ईर्षेनेच मुंडे भगिनींचे राजकीय पतन सुरू झाले आहे. त्यामुळे भविष्यात काय घडेल याचा भरवसा नाही" असं म्हटलं आहे.
"विधान परिषदेच्या दहा जागांसाठीही निवडणूक होईल असे दिसते. 27 मते एका उमेदवारास विजयी होण्यासाठी लागतील. राष्ट्रवादी व शिवसेना त्यानुसार स्वतःचे दोन-दोन उमेदवार सहज जिंकून आणतील. काँग्रेसचा एक उमेदवार जिंकेल व त्यांची साधारण 19 मते शिल्लक राहतात. मात्र काँग्रेसनेही आता चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप या दोघांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे त्यांना आणखी आठ मतांची बेगमी करावी लागेल. पुन्हा त्याच जादा मतांवर डोळा ठेवून भाजपाने त्यांचा पाचवा उमेदवार विधान परिषदेच्या रिंगणात उतरवला आहे."
"राज्यसभेप्रमाणेच विधान परिषदेची सोपी निवडणूक कठीण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. अहंकार व पैशांच्या अतिरेकी बुस्टर डोसचे हे अजीर्ण आहे. महाराष्ट्रात काहीच सुरळीत घडू द्यायचे नाही असेच त्यांचे प्रयत्न आहेत. सुरळीत चाललेले त्यांना पाहवत नाही. अर्थात महाविकास आघाडीचे नेतृत्वही काही लेचेपेचे नाही व भाजपचे पेच – डावपेच त्यांच्यावरच उलटविल्याशिवाय ते राहणार नाहीत. राज्यसभा व नंतरच्या विधान परिषद निवडणुकीत भाजप व त्यांच्या बगलबच्च्यांना धोबीपछाड दिल्याशिवाय ‘ठाकरे सरकार’ स्वस्थ बसणार नाही. घोडा मैदान लांब नाही!" असंही अग्रलेखात म्हटलं आहे.