"सडक्या मेंदूच्या राज्यकर्त्यांनो, तुम्ही गोधडी भिजवत होता तेव्हापासून..."; शिवसेनेचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 10:55 AM2022-09-05T10:55:53+5:302022-09-05T10:57:40+5:30
Shivsena Slams Eknath Shinde, Devendra Fadnavis : "शिवतीर्थावरच दोन तट पाडून कमळाबाईचा भाजप आज आनंदाने नाचत आहे, पण ते स्वप्नरंजनात दंग आहेत" असं म्हणत हल्लाबोल केला आहे.
मुंबई - शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून पुन्हा एकदा राज्यातील नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "शिवतीर्थावरच दोन तट पाडून कमळाबाईचा भाजप आज आनंदाने नाचत आहे, पण ते स्वप्नरंजनात दंग आहेत" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. तसेच सडक्या मेंदूच्या राज्यकर्त्यांनो, तुम्ही गोधडी भिजवत होता तेव्हापासून शिवसेना शिवतीर्थावर दसरा मेळाव्यांचे सीमोल्लंघन करीत आली आहे. आता काय तर म्हणे त्यांचे 'मिशन मुंबई' सुरू झाले आहे! हे मिशन मुंबई म्हणजे दिल्लीच्या बादशाहीचे 'कमिशन मुंबई' आहे असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
"शिवसेनेशी समोरून दोन हात करता येत नाहीत. मग फोडा-झोडा-मजा पाहा. आपापसात झुंज लावा ही ब्रिटिश नीती अवलंबली जात आहे. शिवतीर्थावरच दोन तट पाडून कमळाबाईचा भाजप आज आनंदाने नाचत आहे, पण ते स्वप्नरंजनात दंग आहेत. मराठी माणूस आपसात लढवला जात आहे. कमळाबाईचे हेच तर मिशन होते. ज्यांचे पक्ष कमिशनखोरीच्या मलिद्यावर तरारले आहेत त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार? पण हे राज्य शिवरायांचे आहे. येथे बाळासाहेब ठाकरे यांनी स्वाभिमानी मर्द मावळे घडवले, ते मेल्या आईचे दूध प्यायलेले नाहीत याचे भान राखा! बाकी सारे शिवतीर्थावरच!" असं म्हणत शिवसेनेने जोरदार टीका केली आहे.
सामनाचा आजचा अग्रलेख
- ब्रिटिशांना जे हवे होते, मोगलांना जे घडवायचे होते ते भाजपवाले मराठीजनांकडूनच घडवू पाहत आहेत. फोडा, झोडा आणि मजा पाहत राज्य करा, अशी भाजपची नीती आहे. बुलढाण्यात शिवसेनेतील दोन गटांत हाणामाऱ्या झाल्या. कोण कुठला शिंदे गट व शिवसैनिक एकमेकांच्या अंगावर चाल करून गेले. आपापसात डोकी फुटली. एकमेकांचे कपडे फाटले. यात भाजपचे काय गेले? गमावले ते कष्टकरी मराठी माणसाने. त्याच्या एकीची वज्रमूठ जी शिवरायांच्या भगव्या झेंडय़ाखाली एकवटली होती त्या वज्रमुठीच्या ठिकऱ्या करून भाजप मजा पाहात आहे.
- हे फक्त बुलढाण्यातच घडले काय? हे महाराष्ट्रात जागोजाग घडवले जात आहे. शिवसेना पह्डून त्यांनाच आपापसात झुंजवून संपवायचे. यात आजच्या बेइमानांना क्षणिक लाभ झाला, पण महाराष्ट्र फुटतोय त्याचे काय? आम्ही पाहिले कुठे तरी मंत्री दादा भुसेंच्या विरोधात घोषणा देत, त्यांना काळे झेंडे दाखवीत लोक त्यांच्यावर चाल करून गेले. या झुंजी भाजपने लावल्या आहेत व मराठी माणूस त्यांच्या हातातील मोहरा बनला आहे. आता काय तर म्हणे त्यांचे 'मिशन मुंबई' सुरू झाले आहे! हे मिशन मुंबई म्हणजे दिल्लीच्या बादशाहीचे 'कमिशन मुंबई' आहे.
- मुंबईतील मराठी माणसांत फूट पाडायची. त्यासाठी सत्ता आणि पैशांचा वारेमाप उपयोग करायचा. हा त्यांचा कावा. आमचे शिवतीर्थ व त्यांचे शिवतीर्थ वेगळे आहे. आम्ही शिवतीर्थी दसरा मेळावा घेऊन विचारांचे सोने लुटू नये, 56 वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुखांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची महान परंपरा खंडित व्हावी यासाठी त्यांचे 'मिशन' सुरू आहे. काय तर म्हणे शिवतीर्थावर दसरा मेळावा कोणी घ्यायचा याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे घेतील, असे 'कमळाबाई' मानभावीपणे सांगते.
- अरे सडक्या मेंदूच्या राज्यकर्त्यांनो, तुम्ही गोधडी भिजवत होता तेव्हापासून शिवसेना शिवतीर्थावर दसरा मेळाव्यांचे सीमोल्लंघन करीत आली आहे. यावर जनतेचे नाही तर देवदेवता, संत सज्जनांचेच शिक्कामोर्तब अनेकदा झाले आहे. दसरा मेळाव्यातून फुंकलेल्या रणशिंगातून 'कमळाबाई'च्याही वैभवात भर पडली आहे. महाराष्ट्राची जनता जागती आहे हे देशाला दाखविणारा एक सोहळा असतो, पण हा दसरा मेळावा म्हणे आता कोण कुठला बाटग्यांचा शिंदे गट घेणार. म्हणून शिवसेनेचा दसरा मेळावा होणार की नाही? अशी चर्चा सुरू झाली आहे.
- शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे बेइमानांचा, 'सुरती' बाजारबुणग्यांचा मेळा नसतो. तो असतो अस्सल ज्वलंत हिंदुत्व अभिमान्यांचा उसळता जनसागर. दसरा मेळाव्याचे शिवतीर्थाशी एक नाते आहे. हे नाते तोडणाऱ्यांच्या 56 पिढय़ा खाली उतरल्या तरी त्यांना ते शक्य होणार नाही. सर्वोच्च न्यायालय आम्ही मॅनेज केले अशी भाषा करणारे एक वेळ भाडय़ाची गर्दी जमवून स्वतःचा जयजयकार करतीलही, पण असे हवेतले बुडबुडे येतात आणि फुटतात.
- इतिहासात असे अनेक तोतये निर्माण झाले व गांडुळांप्रमाणे नष्ट झाले. न्याय विकत घ्याल, पण जनमताचा उसळता सागर, जो शिवतीर्थावर लोटत असतो तो सागर कसा विकत घेणार? अलीकडे म्हणे 'राजकीय' शिवतीर्थावर भाजपवाल्यांच्या फेऱ्या वाढल्या आहेत. त्या काही प्रेमाचा पान्हा फुटला म्हणून नाही, तर बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेस जितका अपशकून करता येईल तेवढा करावा यासाठीच.