"भाजपाच्याच कंगनाबेनने बॉम्ब फोडल्याने भाजपाच्या नकली राष्ट्रवादाची गाळण उडाली"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 08:46 AM2021-11-13T08:46:35+5:302021-11-13T08:51:40+5:30

Shivsena Slams Modi Government And Kangana Ranaut : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून कंगना राणौतवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.

Shivsena Slams Modi Government And Kangana Ranaut Over controversial statement about indian independence | "भाजपाच्याच कंगनाबेनने बॉम्ब फोडल्याने भाजपाच्या नकली राष्ट्रवादाची गाळण उडाली"

"भाजपाच्याच कंगनाबेनने बॉम्ब फोडल्याने भाजपाच्या नकली राष्ट्रवादाची गाळण उडाली"

googlenewsNext

मुंबई - भारताला 1947 साली भीक मिळाली व स्वातंत्र्य 2014 साली मिळाले, असे विधान करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौतविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, अकाली दल, राष्ट्रीय जनता दल असे सारेच पक्ष उभे ठाकले आहेत. याच दरम्यान शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून कंगना राणौतवर (Kangana Ranaut) जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. "भाजपाच्याच कंगनाबेनने बॉम्ब फोडला असून त्यामुळे भाजपाच्या नकली राष्ट्रवादाची गाळण उडाली" असं म्हणत अग्रलेखातून निशाणा साधण्यात आला आहे. तसेच "स्वातंत्र्य व क्रांतिकारकांच्या बलिदानाची थोडी जरी चाड असेल तर या राष्ट्रद्रोही वक्तव्याबद्दल कंगनाबेनचे सर्व राष्ट्रीय पुरस्कार परत घेतले पाहिजेत" असंही म्हटलं आहे. 

"एक आण्याची भांग घेतली तर भरपूर कल्पना सुचतात असं एकदा टिळक म्हणाले होते. कंगनाबेनच्या बाबतीत टिळकांचं विधान तंतोतंत खरे ठरते" असं म्हणत शिवसेनेने सणसणीत टोला लगावला आहे. तसेच "शिवसेनेने राष्ट्रवाद, हिंदुत्व गहाण ठेवल्याचे वक्तव्य भाजपवाले करीत असतात . महाराष्ट्रातील सत्ता गमावल्याचा तो जळफळाट असतो; पण त्यांच्या कंगनाबेनने तर भगतसिंगांपासून वीर सावरकरांपर्यंत सगळय़ांवरच अफू - गांजाच्या नशेच्या गुळण्या टाकून त्यांना भिकारी ठरवले आहे. कंगनाबेन यांच्या मते देशाला खरे स्वातंत्र्य 2014 साली मिळाले. मोदींचे राज्य हेच स्वातंत्र्य. बाकी सगळे झूठ! कंगनाबेनचे डोके हे बधीर झाले आहे, असे वरुण गांधी म्हणतात. कोणत्या कारणामुळे ते बधीर झाले ते एनसीबीचे वानखेडेच शोधू शकतील! पण मोदी सरकारचे डोकेही त्याच कारणाने बधीर झाले नसेल तर या देशद्रोहाबद्दल कंगनाबेनचे सर्व राष्ट्रीय पुरस्कार ते परत घेतील. वीरांचा, स्वातंत्र्याचा अपमान देश कधीच सहन करणार नाही" असं देखील अग्रलेखात म्हटलं आहे. 

सामनाचा आजचा अग्रलेख 

- भारतीय जनता पक्षातील पुरुष महामंडळ अधूनमधून बॉम्ब फोडण्याची भाषा करीत असतात. प्रत्यक्षात बॉम्ब कधीच फुटत नाहीत; पण भाजपाच्याच कंगनाबेन राणौत यांनी एक बॉम्ब फोडला असून त्यामुळे भाजपाच्या नकली राष्ट्रवादाची गाळण उडाली आहे. कंगनाबेन यांनी जाहीर केले आहे, 1947 साली हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाले नाही तर भीक मिळाली. देशाला खरे स्वातंत्र्य 2014 सालात मिळाले (म्हणजे मोदी पंतप्रधान झाल्यावर). कंगनाबेनच्या या वक्तव्याचे तीक्र पडसाद देशभरात उमटले आहेत. 

- हिंदुस्थानी स्वातंत्र्यलढय़ाच्या क्रांतिकारकांचा इतका भयंकर अपमान कधीच कोणी केला नव्हता. कंगनाबेन यांना नुकतेच 'पद्मश्री' या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले. यापूर्वी हा सन्मान हिंदुस्थानी स्वातंत्र्यलढय़ात सहभागी झालेल्या वीरांना मिळाला आहे. त्याच वीरांचा अपमान करणाऱ्या कंगनाबेनलाही अशा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे हे देशाचे दुर्दैव आहे. 

- कंगनाबेन यांनी यापूर्वी महात्मा गांधींचाही अपमान केला. तिचे नथुरामप्रेमही उफाळून येत असते. तिच्या बरळण्याकडे एरव्ही कोणी फारसे लक्ष देत नाही. एक आण्याची भांग घेतली तर भरपूर कल्पना सुचतात असं एकदा टिळक म्हणाले होते. कंगनाबेनच्या बाबतीत टिळकांचं विधान तंतोतंत खरे ठरते. 1947 साली स्वातंत्र्य मिळालेच नाही तर भीक मिळाली. पण या भीक मागण्याच्या प्रक्रियेत कंगनाचे सध्याचे राजकीय पूर्वज कोठेच नव्हते. 

- दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून देश मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्यसंग्राम झाला. हजारो नव्हे तर लाखो जणांनी त्याकामी बलिदान केले. तात्या टोपे, झाशीची राणी, वासुदेव बळवंत फडके, तीन चाफेकर बंधू, अश्फाक उलमा खाँ, भगतसिंग, मदनलाल धिंग्रा, सुखदेवांसारखे असंख्य वीर फासावर गेले. वीर सावरकर, टिळकांसारख्यांनी काळय़ा पाण्याच्या शिक्षा भोगल्या. घरादारांवर तुळशीपत्र ठेवले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना करून इंग्रज साम्राज्यास आव्हान दिले. 

- अंदमान, मंडालेचे तुरुंग कांतिकारकांनी भरून गेले. 'चले जाव'चा नारा गांधीजींनी देताच मुंबईतील गिरणी कामगार रस्त्यावर उतरला व इंग्रजांना पळताभुई थोडी झाली. जालियनवाला बागसारखे हत्याकांड ब्रिटिशांनी घडवून स्वातंत्र्ययोद्धय़ांच्या रक्ताने न्हाऊन काढले. रक्त, घाम, अश्रू आणि त्यागातून मिळालेल्या आमच्या स्वातंत्र्याला 'भीक' असे संबोधणे हे राष्ट्रद्रोहाचेच प्रकरण आहे. अशा व्यक्तीस 'पद्मश्री' पुरस्कार देशाचे राष्ट्रपती देतात. त्या सोहळय़ास पंतप्रधान मोदी उपस्थित असतात आणि स्वातंत्र्यास भिकेची उपमा देणाऱया कंगनाबेनचे डोळे भरून कौतुक करतात. 

- स्वातंत्र्य व क्रांतिकारकांच्या बलिदानाची थोडी जरी चाड असेल तर या राष्ट्रद्रोही वक्तव्याबद्दल कंगनाबेनचे सर्व राष्ट्रीय पुरस्कार परत घेतले पाहिजेत. शिवसेनेने राष्ट्रवाद, हिंदुत्व गहाण ठेवल्याचे वक्तव्य भाजपवाले करीत असतात. महाराष्ट्रातील सत्ता गमावल्याचा तो जळफळाट असतो; पण त्यांच्या कंगनाबेनने तर भगतसिंगांपासून वीर सावरकरांपर्यंत सगळय़ांवरच अफू-गांजाच्या नशेच्या गुळण्या टाकून त्यांना भिकारी ठरवले आहे. कंगनाबेनचे हे भिकार वक्तव्य ऐकून गुजरातमधील सरदार पटेलांचा जगातला उंच पुतळाही अश्रू ढाळत असेल. 

- कंगनाबेन यांच्या मते देशाला खरे स्वातंत्र्य 2014 साली मिळाले. मोदींचे राज्य हेच स्वातंत्र्य. बाकी सगळे झूठ! या ऐतिहासिक विचारांशी भाजपातले वीर पुरुष सहमत आहेत काय? भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी कंगनाबेनच्या भिक्कार वक्तव्याचा धिक्कार केला आहे. हा देशद्रोहच आहे असे वरुण गांधी सांगतात. अनुपम खेर यांनीही लाजत लाजत कंगनाचा निषेध केला आहे. पण भाजपातील प्रखर राष्ट्रवादी अद्यापि गप्प का आहेत?

- 14 ऑगस्ट 1947ला मध्यरात्री हा देश स्वतंत्र झाला. तेव्हा स्वातंत्र्याचे स्वागत करून राष्ट्राच्या पुनर्घटनेच्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार स्वतंत्र हिंदुस्थानचे पहिले पंतप्रधान पं. नेहरू यांनी घटनासभेत केला… ''जग झोपले असेल तेव्हा भारत जिवंत व स्वतंत्र झालेला असेल. असा क्षण इतिहासात क्वचितच येतो. तो आल्यावर एक युग संपून दुसरे युग सुरू होते. राष्ट्राचा दीर्घकाळ दडपलेला आत्मा जागृत होतो आणि त्यास हुंकार मिळतो.'' हा देश स्वतंत्र झाला तेव्हा असा क्षण आला होता. 

- 14 ऑगस्टच्या मध्यरात्री देशावरील युनियन जॅक खाली उतरवला गेला. तेव्हा देशभरात उत्साह होता. तो उत्सव, तो उत्साह देशाला भीक मिळाली म्हणून नव्हता. देश स्वतंत्र झाला तेव्हा लोकमान्य टिळकांना 1906 साली शिक्षा झाली त्या चुकीचे परिमार्जन करण्याचे ठरले. मग हायकोर्टात एक फलक लावला गेला. ''न्यायालयाने मला दोषी ठरविले असेल तरी या न्यायालयापेक्षा श्रेष्ठ असे न्यायालय आहे व त्याच्यापुढे मी निर्दोष आहे,'' या अर्थाची लोकमान्यांची धीरोदत्त वाक्ये या फलकावर कोरण्यात येऊन त्याचे सन्मानपूर्वक अनावरण मुख्य न्यायाधीश छगला यांच्या हस्ते झाले. 

- लोकमान्यांना शिक्षा झाली तेव्हा आपण कुमार होतो आणि रागामुळे हातात धोंडा घेऊन तो ब्रिटिश साम्राज्यावर फेकावासा वाटला, असे छागला म्हणाले होते. हा संताप, ही चीड म्हणजेच स्वातंत्र्यसंग्राम. त्यातून गुलामीच्या बेडय़ा तुटल्या. कंगनाबेनचे डोके हे बधीर झाले आहे, असे वरुण गांधी म्हणतात. कोणत्या कारणामुळे ते बधीर झाले ते एनसीबीचे वानखेडेच शोधू शकतील! पण मोदी सरकारचे डोकेही त्याच कारणाने बधीर झाले नसेल तर या देशद्रोहाबद्दल कंगनाबेनचे सर्व राष्ट्रीय पुरस्कार ते परत घेतील. वीरांचा, स्वातंत्र्याचा अपमान देश कधीच सहन करणार नाही!

 

Web Title: Shivsena Slams Modi Government And Kangana Ranaut Over controversial statement about indian independence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.