"महाशक्तीच्या राज्यांत 'रुपया' खतम; आमदार-खासदारांना खोक्यात किमती मोजाव्या लागल्या"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 08:37 AM2022-07-21T08:37:27+5:302022-07-21T08:47:12+5:30

Shivsena And BJP : "लोकशाहीची अवस्थाही घसरलेल्या रुपयापेक्षा वेगळी नाही. रुपया तळाला आणि लोकशाही रसातळाला, अशी भयंकर अवस्था सध्या आपल्या देशाची झाली आहे"

Shivsena Slams Modi government BJP And Eknath Shinde government Over political situation in maharashtra | "महाशक्तीच्या राज्यांत 'रुपया' खतम; आमदार-खासदारांना खोक्यात किमती मोजाव्या लागल्या"

"महाशक्तीच्या राज्यांत 'रुपया' खतम; आमदार-खासदारांना खोक्यात किमती मोजाव्या लागल्या"

Next

मुंबई - डिसेंबर २०१४ पासून आतापर्यंत रुपया सुमारे २५ टक्क्यांनी घसरला, अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत दिली. सध्या रुपयाची जी घसरण सुरू आहे, त्यास रशिया-युक्रेन यांच्यातील संघर्षासारखे जागतिक घटक कारणीभूत आहेत, असेही सीतारामन यांनी सांगितले. रुपयाची घसरण आणि महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवरून शिवसेनेने भाजपा आणि मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. "महाशक्तीच्या राज्यांत 'रुपया' खतम झाला. त्यामुळे आमदार-खासदारांना खोक्यात किमती मोजाव्या लागल्या, पण शेतकऱ्यांच्या मालास दमडीचा हमीभाव द्यायला महाशक्तीचे सरकार तयार नाही" असं म्हणत हल्लाबोल करण्यात आला आहे. सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. 

"महाराष्ट्रातील फुटीर गटाचे नेते गुवाहाटी येथे आपल्या आमदारांना ठासून सांगत होते की, चिंता करू नका. आपल्यामागे एक महाशक्ती उभी आहे. मात्र त्याच महाशक्तीच्या राज्यांत 'रुपया' खतम झाला. त्यामुळे आमदार-खासदारांना खोक्यात किमती मोजाव्या लागल्या, पण शेतकऱ्यांच्या मालास दमडीचा हमीभाव द्यायला महाशक्तीचे सरकार तयार नाही. रुपयाने डॉलरच्या तुलनेत 80 रुपयांच्या खाली येत ऐतिहासिक ‘नीचांक’ गाठला आहे. लोकशाहीची अवस्थाही घसरलेल्या रुपयापेक्षा वेगळी नाही. रुपया तळाला आणि लोकशाही रसातळाला, अशी भयंकर अवस्था सध्या आपल्या देशाची झाली आहे. सत्तानंदात मग्न असणाऱ्या राज्यकर्त्यांना त्याची ना फिकीर आहे ना काळजी!" असं देखील सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. 

सामनाचा आजचा अग्रलेख

- श्रीलंकेत आर्थिक अराजकाचा उद्रेक होऊन लोक रस्त्यावर उतरले. जनतेच्या उद्रेकामुळे राष्ट्रपती व पंतप्रधानांना देशातून परागंदा व्हावे लागले. या सगळ्याचा आपल्या देशावर काय परिणाम होऊ शकतो यावर विचारमंथन करण्यासाठी केंद्र सरकारने दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली. अर्थमंत्री व परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी जाहीर केले की, ‘श्रीलंकेबरोबर आपल्या देशाची तुलना करणे बरोबर नाही. आपले परिस्थितीवर संपूर्ण नियंत्रण आहे. रुपया असा उद्ध्वस्त झालेला पाहणे हे सर्व काही ठीकठाक असल्याचे लक्षण आहे काय?

- एकंदरीत परिस्थिती चांगली नाही व उपाय-उपचारांची गरज आहे हे मान्य करून सरकारने धोरणे आखायला हवीत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महाग होत जाईल तसतशी महागाईची आग वाढत जाईल. रशिया-युक्रेन युद्धाच्या या झळा आहेत असे खुलासे करण्यात येत आहेत, पण त्याचवेळी देशातील विरोधकांची सरकारे खाली खेचण्यासाठी, आमदार-खासदारांची खरेदी-विक्री करण्यासाठी हजार-हजार कोटी रुपयांचा खुर्दा बाजारात उडविला जात आहे. सामान्य जनतेने महागाईशी सामना करायचा आणि राज्यकर्त्यांनी आमदार-खासदारांवर दौलतजादा करून राजकारण करायचे, हा काय प्रकार आहे?

- महागाई वाढतच आहे व देशातील ७८ टक्के शहरी लोकांनी खर्चात कपात केली आहे. रोजचे जगण्याचे जिन्नस महागले आहेत. सामान्य माणूस व मध्यमवर्गीय जीवनाच्या अत्यंत कठीण प्रसंगातून जात आहे. मुलांचे शिक्षण थांबवून दोन वेळच्या जेवणास प्राधान्य देण्याची वेळ लाखो कुटुंबांवर आली आहे. या गरीब वर्गासमोर आंतरराष्ट्रीय बाजार, श्रीलंकेची स्थिती, युक्रेन-रशिया युद्धाबाबत प्रवचने झोडून काय साध्य होणार? 

- महाराष्ट्रातील महाप्रलयात विदर्भाचा शेतकरी उद्ध्वस्त झाला. त्यांची घरे, शेती वाहून गेली, त्याचा श्रीलंकेतील अराजकाशी काय संबंध? महाराष्ट्राप्रमाणे देशातील अनेक भागांत यापेक्षा गंभीर स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. देशातील अनेक मोठ्या योजना आणि प्रकल्प रखडून पडले आहेत आणि ‘अग्निवीर’सारख्या पोकळ योजनांचा ढोल वाजवला जात आहे. या अग्निवीरांचे भविष्यही अंधःकारमय आहे.

- फक्त तीन वर्षांत ३ लाख ९० हजार भारतीय नागरिकांनी भारत सोडून दुसऱ्या देशांत स्थलांतर केले. आपला देश सोडून दुसऱ्या देशांचे नागरिकत्व स्वीकारणाऱ्यांची ही संख्या छोटी नाही. एवढ्या मोठ्या लोकसंख्येने दुसऱ्या देशाला आपलं मानण्याचा हा प्रकार क्लेशदायकच आहे. हे सगळे कशामुळे घडले असावे याचा विचार राज्यकर्त्यांनी करायला हवा. मात्र राज्यकर्ते सध्या फक्त सत्ताकारणातच मग्न आहेत. देशाच्या प्रश्नांवर विरोधकांना बोलू द्यायचे नाही, रुपया कोसळला तशी विरोधी पक्षांची अवस्था करायची, हा एककलमी कार्यक्रम देशात राबविला जात आहे. ते देशाला घातक आहे.

 

Web Title: Shivsena Slams Modi government BJP And Eknath Shinde government Over political situation in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.