"...तर भ्रमाचा भोपळाही फुटणार हे निश्चित"; मोदी सरकारच्या 'दिवाळी गिफ्ट'वरून शिवसेनेचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 08:48 AM2021-11-05T08:48:20+5:302021-11-05T08:51:15+5:30

Shivsena Slams Modi Government "इंधन स्वस्ताईचा देखावा, पोटनिवडणुकीत पराभवाचे फटके बसले म्हणून सरकारला आली जाग" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे.

Shivsena Slams Modi Government Over petrol and diesel price india | "...तर भ्रमाचा भोपळाही फुटणार हे निश्चित"; मोदी सरकारच्या 'दिवाळी गिफ्ट'वरून शिवसेनेचं टीकास्त्र

"...तर भ्रमाचा भोपळाही फुटणार हे निश्चित"; मोदी सरकारच्या 'दिवाळी गिफ्ट'वरून शिवसेनेचं टीकास्त्र

Next

मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीनं उच्चांक गाठला होता. देशात काही ठिकाणी पेट्रोलचे दर 120 रूपयांच्या पुढे गेले होते. तर डिझेलचे दरही 100 रूपयांच्या पुढे गेले होते. परंतु दिवाळीच्या तोंडावर सरकारनं देशवासीयांना दिलासा देत उत्पादन शुल्कात (excise duty) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. याच दरम्यान मोदी सरकारच्या (Modi Government) 'दिवाळी गिफ्ट'वरून शिवसेनेने (Shivsena) जोरदार हल्लाबोल केला आहे. "इंधन स्वस्ताईचा देखावा, पोटनिवडणुकीत पराभवाचे फटके बसले म्हणून सरकारला आली जाग" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. तसेच "आवाक्याबाहेरील इंधन दरवाढ आणि महागाईने जनतेचे जे आजवर नुकसान झाले आहे त्याचे काय?" असा सवालही केला आहे. 

सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. "तेरा राज्यांतील पोटनिवडणुकांत मतदारांनी 'आरसा' दाखविला नसता तर कदाचित केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी स्वतःला त्या आरशात पाहण्याची तसदीही घेतली नसती. ठीक आहे. पोटनिवडणुकांतील पराभवाच्या धक्क्याने का होईना, केंद्र सरकारला जाग आली आणि त्यांनी इंधन स्वस्ताईचा देखावा केला, हेही नसे थोडके. अर्थात, या देखाव्याची जनतेला भुरळ पडेल आणि पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकीत 'मत' परिवर्तन होईल, अशी सरकार पक्षाची अपेक्षा असेल तर त्यांचा हा भ्रमाचा भोपळाही या पोटनिवडणुकीप्रमाणे फुटणार, हे निश्चित आहे" असं अग्रलेखात म्हटलं आहे. 

सामनाचा आजचा अग्रलेख

- केंद्र सरकारने अखेर पेट्रोल - डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारचे हे सर्वसामान्यांना 'दिवाळी गिफ्ट ' वगैरे आहे, असे ढोल आता सत्ताधारी मंडळी पिटत आहेत. तेरा राज्यांतील लोकसभा - विधानसभा पोटनिवडणुकांत भारतीय जनता पक्षाचे ढोल मतदारांनी फोडले असले तरी त्यांचे ढोल पिटण्याची हौस काही कमी झालेली नाही. वस्तुस्थिती ही आहे की, या पोटनिवडणुकांतील पराभवामुळेच केंद्रातील सरकारला हे 'शहाणपण' आले आहे.

- सरकारला इंधन स्वस्ताईची दिवाळी गिफ्टच द्यायची होती तर हा निर्णय दिवाळीच्या पूर्वसंध्येला किंवा त्यापूर्वी का घेतला नाही? पोटनिवडणुकीत पराभवाचे फटके आणि झटके बसले म्हणून सरकारला जाग आली. भयंकर इंधन दरवाढीचे जे चटके सामान्य जनता सहन करीत आहे त्याची झळ भाजपला बसली. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घाईघाईने घेण्यात आला आणि त्यावर ' दिवाळी गिफ्ट ' चा मुलामा चढविला गेला.

- पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 5 रुपयांनी, तर डिझेलवरील 10 रुपयांनी कमी करण्यात आले आहे. अर्थात तरीही पेट्रोल - डिझेल प्रतिलिटर शंभरीपारच असणार आहे . तेव्हा केंद्राने काही प्रमाणात जनतेला दिलासा दिला हे खरे असले तरी ही काही 'दिवाळी गिफ्ट' वगैरे म्हणता येणार नाही. शिवाय इंधनाचे दर खूप खाली घसरले आहेत असे नाही. त्यामुळे महागाईचा वणवा विझेल अशी अपेक्षा करता येणार नाही. म्हणजे पेट्रोल - डिझेलवरील खर्च किंचित कमी होईल, पण सर्वसामान्यांचा रिकामा झालेला खिसा भरला, असे अजिबात होणार नाही.

-  मुळात केंद्राला जर खरंच ' दिवाळी गिफ्ट ' द्यायचे होते तर मग सामान्य जनतेचा रिकामा झालेला खिसा कसा भरेल, विझलेल्या चुली कशा पेटतील अशा पद्धतीने इंधन स्वस्त करायला हवे होते. मात्र तेवढी इच्छाशक्ती केंद्र सरकारने दाखविलेली नाही. दिले, पण हात आखडता ठेवून दिले' असेच या इंधन दरकपातीबाबत म्हणता येईल.

-  वास्तविक, गेल्या एक - दीड वर्षात जी ' न भूतो ' इंधन दरवाढ झाली त्या माध्यमातून केंद्राच्या तिजोरीत लाखो - कोटींची भर पडली आहे. तशी ही जनतेची केलेली लूटच आहे. तेव्हा सामान्य जनतेला दिलासाच द्यायचा होता तर तो समाधानकारक द्यायचा होता, पण त्यासाठी इंधन करकपात जास्त करावी लागली असती आणि ती करण्याचा मोठेपणा दाखवावा लागला असता. ती सरकारने' संधी ' गमावली आहे. 

- इंधन दरकपात होऊनही आपल्या पदरात नेमके काय पडले याचा शोध जनता घेत आहे आणि तिकडे या दरकपातीमुळे एका वर्षात 1.4 लाख कोटींचे नुकसान आपल्याला सोसावे लागणार असे म्हणून सरकार सुस्कारे सोडीत आहे. सरकारने काय ते सुस्कारे, उसासे सोडावेत, पण आवाक्याबाहेरील इंधन दरवाढ आणि आकाशाला भिडलेली महागाई यामुळे सामान्य जनतेचे जे आजवर नुकसान झाले आहे त्याचे काय? 

- मुळात आधी भाव भरपूर वाढवायचे आणि मग किंचित कमी करून दिलासा, दिवाळी गिफ्ट वगैरे गोष्टी करायच्या असा हा इंधन दरकपातीचा देखावा आहे. तेरा राज्यांतील पोटनिवडणुकांत मतदारांनी 'आरसा' दाखविला नसता तर कदाचित केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी स्वतःला त्या आरशात पाहण्याची तसदीही घेतली नसती. 

- ठीक आहे. पोटनिवडणुकांतील पराभवाच्या धक्क्याने का होईना, केंद्र सरकारला जाग आली आणि त्यांनी इंधन स्वस्ताईचा देखावा केला, हेही नसे थोडके. अर्थात, या देखाव्याची जनतेला भुरळ पडेल आणि पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकीत 'मत' परिवर्तन होईल, अशी सरकार पक्षाची अपेक्षा असेल तर त्यांचा हा भ्रमाचा भोपळाही या पोटनिवडणुकीप्रमाणे फुटणार, हे निश्चित आहे.
 

Web Title: Shivsena Slams Modi Government Over petrol and diesel price india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.