वर्सोव्यात वर्चस्वासाठी शिवसेनेची रणनीती
By admin | Published: July 21, 2016 02:45 AM2016-07-21T02:45:56+5:302016-07-21T02:45:56+5:30
मुंबई महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत.
मनोहर कुंभेजकर,
मुंबई- मुंबई महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. शिवसेनेने वर्सोवा विधानसभा मतदार संघात आगेकूच करण्यासाठी रणनीती आखली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विधानसभेच्या उमेदवार राजुल पटेल यांचा निवडणूक अर्ज निवडणूक आयोगाने रद्द केला होता. माजी आमदार बलदेव खोसा यांच्यावर असलेली मतदारांची नाराजी, मोदी लाट आणि निवडणुकीत शिवसेना उभी राहिली नसल्यामुळे वर्सोवा विधानसभा मतदार संघातून भाजपाच्या आमदार म्हणून डॉ.भारती लव्हेकर या २६ हजारांहून अधिक मतांनी निवडून आल्या. मात्र आगामी पालिका निवडणुक ही शिवसेना आणि भाजपच्या अस्तित्वाची लढाई आहे. पालिका निवडणुकीत आपले वर्चस्व राखण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे.
खासदार गजानन कीर्तिकर, विभागप्रमुख-आमदार डॉ.अनिल परब आणि महिला विभागसंघटक राजुल पटेल यांनी या मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले आहे. डॉ.अनिल परब आणि राजुल पटेल या अनुभवी नेत्यांनी येथील प्रत्येक शाखांना भेटी देऊन शिवसैनिक, ज्येष्ठ शिवसैनिक आणि गटप्रमुख यांच्याशी सविस्तर चर्चा करून येथील मतदार संघाचा सविस्तर आढावा नुकताच पूर्ण केला. वर्सोवा विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी दिवसरात्र मेहनत करून आगामी पालिका निवडणुकीला सज्ज राहा, असे आदेश त्यांनी येथील शिवसैनिकांना दिले आहेत.
याच रणनीतीचा भाग म्हणून रविवार, २४ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता अंधेरी (प) येथील शहाजी राजे क्रीडा संकुलात (स्पोटर््स कॉम्प्लेक्स) मध्ये येथील ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार सोहळा शिवसेना शाखा क्र ५५, ५६, ५९ यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला आहे. स्थायी समिती अध्यक्ष यशोधर (शैलेश) फणसे यांच्या पुढाकाराने उपविभागप्रमुख राजेश शेट्ये आणि महिला उपविभाग संघटक शीतल सावंत यांनी हे आयोजन केलेले आहे. खासदार गजानन कीर्तिकर, डॉ.अनिल परब आणि राजुल पटेल आदी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ शिवसैनिकांचा आदर्श घेऊन तरुण पिढीतील शिवसैनिकांना विभागात काम करण्याची प्रेरणा मिळावी, म्हणून येथील गटप्रमुखांच्या मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती शेट्ये यांनी दिली. सोहळ््यासाठी शाखाप्रमुख सुधाकर अहिरे, सूर्यकांत खवळे, अनिल राऊत, महिला शाखासंघटक जागृती भानजी, रंजना हरळीकर आणि बेबीताई पाटील सक्रिय आहेत. तळागाळातील कार्यकर्त्यांची नाराजी राहू नये, अन्यथा हे निवडणुकीत त्रासदायक ठरु शकते, याचा अंदाज घेऊनच अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे शिवसेनेच्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने ‘लोकमत’ला सांगितले.