अणेंच्या पदमुक्तीवर शिवसेना ठाम
By Admin | Published: December 18, 2015 02:42 AM2015-12-18T02:42:59+5:302015-12-18T02:42:59+5:30
राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी मांडलेल्या स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सभागृहात भूमिका मांडली. परंतु यातून स्पष्ट
नागपूर : राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी मांडलेल्या स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सभागृहात भूमिका मांडली. परंतु यातून स्पष्ट खुलासा न झाल्याचे सांगत अणे यांना पदमुक्त करण्याचा मुद्दा सदस्य शरद रणपिसे व संजय दत्त यांनी गुरु वारी विधान परिषदेत औचित्याद्वारे उपस्थित केला. विरोधी सदस्यांनीही यावर आग्रही भूमिका मांडली तर जोपर्यंत अणेंना पदमुक्त करणार नाही तोपर्यत सभागृहात व सभागृहाबाहेर शिवसेनेचा विरोध कायम राहणार असल्याचे शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
८ डिसेंबरपासून औचित्याद्वारे अणे यांच्या पदमुक्तीचा मुद्दा उपस्थित करीत आहोत. परंतु मुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्ट खुलासा केला नसल्याचे मत रणपिसे यांनी मांडले. मुंबईसाठी १०६ हुतात्मे झाले हे थोतांड असल्याचे अणे यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले आहे. अशी हिंमत महाधिवक्ता करीत आहे. याचा खुलासा झाला नसल्याचे शेकापचे जयंत पाटील म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या इच्छेप्रमाणे महाधिवक्ता वागत असले तर हे संयुक्तिक नसल्याचे जनार्दन चांदूरकर यांनी सांगितले. विधिमंडळाचे दोन्ही सभागृह सार्वभौम आहे. त्यामुळे अणे यांच्यासंदर्भात काय निर्णय होतो, याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री व्यक्तिगत प्रामाणिक आहेत. परंतु महाधिवता यांच्यासंदर्भात मात्र तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो, अशी त्यांची भूमिका असल्याचे मत नीलम गोऱ्हे यांनी मांडले. महाधिवक्ता हुतात्म्यांचा अपमान करीत असताना सदस्य हतबल असेल तर या सभागृहाचा काय उपयोग असे हेमंत टकले म्हणाले. न्यायालयात मागासवर्गीयांची अनेक प्रकरणे आहेत. अणे मागासवर्गीयांच्या बाजूने भूमिका मांडण्याची शक्यता नसल्याने मागासवर्गीयांना न्याय कसा मिळणार, असा प्रश्न हरिसिंग राठोड यांनी उपस्थित केला. अणे यांच्या मुद्यावरून शिवसेना व विरोधी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत सभागृहात गोंधळ घातला.(प्रतिनिधी)