Sunil Prabhu : "...तर शिवसेना आपला अवतार दाखवेल"; सुनील प्रभूंचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 05:48 PM2022-09-21T17:48:11+5:302022-09-21T18:02:27+5:30
Shivsena Sunil Prabhu And Maharashtra Government : शिवसेना नेते सुनील प्रभू यांनी राज्यातील नव्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे,
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून राजकारण तापलं आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर होऊ नये, यासाठी शिंदे गट आणि भाजप प्रयत्नशील असल्याच्या चर्चा आहेत. तर दसरा मेळाव्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्यासाठी रणनीती आखल्याचेही बोलले जात आहे. मात्र, यातच आता आपला दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असून, त्यासाठी कामाला लागण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांना दिल्याचे सांगितले जात आहे. याच दरम्यान शिवसेनेने पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा दिला आहे.
शिवसेना नेते सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी राज्यातील नव्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बाळासाहेब ठाकरेंपासून एक नेता, एक मैदान हे शिवसेनेचं समीकरण आहे. त्यामुळे दसऱ्या मेळाव्यासाठी आम्हाला शिवाजी पार्कवर परवानगी दिली नाही तर शिवसेना आपला अवतार दाखवेल, असा इशारा सुनील प्रभू यांनी दिला आहे. तसेच न्यायालयाकडून आम्हाला न्याय मिळेल असंही म्हटलं आहे. तसेच राहुल शेवाळेंवरही त्यांनी निशाणा साधला आहे.
"शिवसेना तुम्ही सोडली, आम्ही नाही..."
"राहुल शेवाळेंना सांगणे आहे की शिवसेना तुम्ही सोडली, आम्ही नाही. आम्ही पाहू काय करायचं ते. ज्यांनी विचारांची मर्यादा सोडली ते अशा पद्धतीने बोलत आहेत. ज्यांच्या विचाराने हे मोठे झाले त्यांच्या बद्दल असं बोलणं ही संस्कृती नाही" असं देखील सुनील प्रभू यांनी म्हटलं आहे. TV9 शी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. "शिवाजी पार्क सील केलं तर ते तोडून टाकू" असं म्हणत चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) आक्रमक झाले आहेत.
"शिवाजी पार्क सील केलं तर ते तोडून टाकू"
"परवानगी कशी देत नाहीत? परवानगी द्यावीच लागेल. सर्व शिवसैनिक मुंबईत येतात. शिवाजी पार्क सील केलं तर ते तोडून टाकू, पण शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार" असल्याचा निर्धार खैरेंनी व्यक्त केला आहे. तसेच दसरा मेळावा हा शिवतीर्थावर होतो. ही परंपरा खंडित होणार नाही. कायदा सुव्यवस्था बिघडली तर ईडी सरकार जबाबदार असेल असा इशारा देखील चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे.