ShivSena Symbol Row: 'अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना देशातील संस्थांवर असा हल्ला झाला नव्हता'- शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 06:42 PM2023-02-22T18:42:45+5:302023-02-22T18:42:54+5:30
'नरेंद्र मोदींच्या राजवटीत देशातील संस्थांवर हल्ला झाला. आजचे सरकार इतर राजकीय पक्षांना काम करू देत नाही.'
Sharad Pawar On BJP: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या गोंधळाचे वातावरण आहे. शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्हावरुन सुरू असलेला गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाही. याप्रकरणी आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे वक्तव्य समोर आले असून यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. 'एक विचारधारा आणि पक्ष देशातील बंधुभाव नष्ट करत आहे', अशी टीका त्यांनी केली.
माध्यमांशी संवाद साधताना पवार म्हणाले की, 'अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना देशाच्या संस्थांवर असा हल्ला झाला नव्हता. नरेंद्र मोदींच्या राजवटीत देशातील संस्थांवर हल्ला झाला. आजचे सरकार इतर राजकीय पक्षांना काम करू देत नाही. निवडणूक आयोगाचा वापर विरोधात केला जात आहे. हा राजकीय पक्षावरचा हल्ला आहे. निवडणूक आयोगाने असा निर्णय कधीच दिला नव्हता. निवडणूक आयोगाचा असा निर्णय पहिल्यांदाच पाहिला,' असं शरद पवार म्हणाले.
याशिवाय शरद पवार यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील लढतीच्या आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, 'शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती आणि त्यांचे निवडणूक चिन्ह आयोगाने दुसऱ्या कोणाला दिले होते. माझीही काँग्रेसविरोधात पक्ष चिन्हावरुन लढत सुरू होती, पण त्यावेळी निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य होता,' असंही ते म्हणाले.
'सत्तेचा गैरवापर करून एखाद्या पक्षाला व एखाद्या नेतृत्त्वाचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होतो, त्यावेळी लोक त्या नेतृत्त्वासोबत उभे राहतात. यापूर्वीही काही पक्षांमध्ये फूट पडली. मात्र, रागाची भावना व्यक्त करण्यासाठी एखाद्या पक्षाचे नाव व चिन्ह काढून घेण्याचा प्रकार आजपर्यंत झाला नव्हता. त्यामुळे निवडणूक आयोग स्वत: निर्णय घेतंय का त्यांना कोणी मार्गदर्शन करतंय हे महत्त्वाचं आहे', असे शरद पवार पुण्यात बोलताना म्हणाले.