शिवसेना नाव छत्रपती शिवाजींचे घेते आणि करणी अफजल खानाची करते- योगी आदित्यनाथ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 09:06 AM2018-05-24T09:06:40+5:302018-05-24T09:06:40+5:30
शिवसेना नाव जरी छत्रपती शिवाजी महाराजांचे घेत असली तरी तिची करणी मात्र अफजलखानाची आहे अशी घणाघाती टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथील विराट सभेत केली.
वसई : शिवसेना नाव जरी छत्रपती शिवाजी महाराजांचे घेत असली तरी तिची करणी मात्र अफजलखानाची आहे अशी घणाघाती टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथील विराट सभेत केली. वनगा कुटुंबीय आणि त्यांच्या पुत्राला उमेदवारी देणे हा भाजपाचा अंतर्गत मामला होता. त्यात नाक खुपसण्याचे शिवसेनेला काहीही कारण नव्हते. तरीही त्यांनी ती आगळीक केले.
शिवसेनाप्रमुखांना कुणीही विसरू शकणार नाही. कारण त्यांनी कधीही कोणाच्याही पाठित खंजीर खुपसला नाही. परंतु आता ते कार्य शिवसेनेकडून सुरू आहे. चिंतामण वनगा हे माझे जवळचे मित्र होते. त्यांनी पालघरच्या विकासासाठी मोठे काम केले. त्यामुळे त्या मैत्रीपोटी मी येथे आलो. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य कसे चालवावे, हे दाखवून दिले असे कौतुकही त्यांनी केले.
पंतप्रधान मोदी यांना सगळे जग मान देते. त्यांचा सन्मान करते. त्यांनी राबविलेल्या धोरणांमुळे पाकिस्ताननी पैदा केले दहशतवादी मुर्गे सीमेवरच ठार केले जात आहेत. त्यामुळे देशातील दहशतवाद घटला आहे. असेही त्यांनी सांगितले. आपल्या भाषणाचा प्रारंभ मराठीत करून त्यांनी श्रोत्यांची मने जिंकून घेतली.