"इतर पक्षात काय वागणूक मिळते, याचा...", वसंत मोरेंच्या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंचा मनसेला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 03:17 PM2024-07-09T15:17:25+5:302024-07-09T15:21:23+5:30

Uddhav Thackeray : वसंत मोरे यांच्यासह मनसेचे १७ शाखाअध्यक्ष, ५ उपविभाग अध्यक्ष, १ शहराध्यक्ष, पर्यावरण सेनेचे अनेक पदाधिकारी, वाहतूक सेनेचे पदाधिकारी, माथाडीचे पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.

Shivsena UBT Leader Uddhav Thackeray Slams MNS After Vasant More Join The Shiv Sena Ubt Party | "इतर पक्षात काय वागणूक मिळते, याचा...", वसंत मोरेंच्या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंचा मनसेला टोला

"इतर पक्षात काय वागणूक मिळते, याचा...", वसंत मोरेंच्या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंचा मनसेला टोला

मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेतून वंचित बहुजन आघाडीमध्ये गेलेल्या वसंत मोरे यांनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री बंगल्यावर वसंत मोरे यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी वसंत मोरे यांनी शिवबंधन बांधत हाती मशाल घेतली. वसंत मोरे यांच्यासह मनसेचे १७ शाखाअध्यक्ष, ५ उपविभाग अध्यक्ष, १ शहराध्यक्ष, पर्यावरण सेनेचे अनेक पदाधिकारी, वाहतूक सेनेचे पदाधिकारी, माथाडीचे पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी वसंत मोरे यांचे स्वागत केले आणि मनसेला अप्रत्यक्षरित्या टोला लगावला. 

उद्धव ठाकरे म्हणाले, "वसंत मोरेंसह आपल्या स्वगृही परतलेल्या सर्व बांधवांनो आणि भगिनींनो लोकसभेआधी आम्ही सर्वजण बघत होतो, वसंतराव काय करतात हे बघत होतो. काय करायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. पण एका गोष्टीचं मला नक्कीच समाधान आहे की तुम्ही पहिले शिवसैनिक होतात. मधल्या काळात शिवसेनेच्या बाहेर पक्षात काय वागणूक मिळते, काय सन्मान मिळतो, याचा अनुभव घेतला आणि तो अनुभव घेऊन तुम्ही अधिक परिपक्व होऊन स्वगृही परतला आहात. त्यामुळे आज तुमचं महत्त्व, काम आणि जबाबदारी फार मोठी आहे."

शिवसेना सोडल्याबद्दल तुम्हाला शिक्षा झाली पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये एकच हशा पिकला. ते म्हणाले, "मी शिवबंधन बांधत असताना काहींनी मला आम्हीही शिवसैनिक होतो, असे सांगत होते. त्यामुळे आता तुम्हाला शिवसेना सोडल्याबद्दल शिक्षा ही झालीच पाहिजे. ती वसंत मोरेंनाही व्हायला पाहिजे. मी तुम्हाला देतोय, ती शिक्षा हीच आहे की, पूर्वीपेक्षा कित्येक पटीने मला पुण्यात शिवसेना वाढवून हवी आहे. ती वाढवण्याची जबाबदारी मी वसंत मोरेंना देतोय. शिक्षा हा गंमतीशीर शब्द आहे, तो तशा पद्धतीने घेऊ नका. पण ही जबाबदारी म्हणून घ्या."

दरम्यान, वसंत मोरे हे मनसेत असल्यापासून कायम चर्चेत राहिले होते. वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेला रामराम केला. त्यानंतर वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आणि लोकसभा निवडणूक लढवली. मात्र, त्यांच्या मोठ्या फरकाने पराभव झाला. या निवडणुकीत भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारली. आता आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यामुळे पुण्यात शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढली आहे.

Web Title: Shivsena UBT Leader Uddhav Thackeray Slams MNS After Vasant More Join The Shiv Sena Ubt Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.