Video: एक पक्ष, एक नेता, एक विचार, एक मैदान...; शिवतीर्थावर ठाकरेंचाच आवाज घुमणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 04:06 PM2023-10-12T16:06:15+5:302023-10-12T16:13:44+5:30
शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी मिळताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.
दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कुणाला मिळणार? या प्रश्नाकडे शिवसैनिकांचं लक्ष लागलं होतं. दोन्ही गटाकडून शिवाजी पार्क मैदान मिळावं म्हणून महिन्याभरापूर्वीच अर्ज करण्यात आले होते. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळण्याबाबत महापालिकेकडे केलेला अर्ज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अधिकृतरीत्या मागे घेतला आहे. तसे रीतसर पत्र आमदार सदा सरवणकर यांनी जी-उत्तर विभागाच्या सहायक आयुक्तांना दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार हिंदू सणांमध्ये एकमेकांमधील वाद टाळावा व हे सण हिंदू धर्मीयांना तसेच महाराष्ट्र प्रेमींना आनंदाने साजरे करता यावेत यासाठी अर्ज मागे घेत आहोत, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. यानंतर आता शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी मिळताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. एक पक्ष, एक नेता, एक विचार आणि एक मैदान शिवतीर्थ असं या टीझरमध्ये म्हटलं आहे.
एकच मैदान, शिवतीर्थ!
— Shivsena UBT Communication (@ShivsenaUBTComm) October 12, 2023
दसरा मेळावा २०२३#shivsena#ShivsenaUBT#दसरामेळावा2023pic.twitter.com/mb86ExXxGj
ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याच्या टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे शिवाजी पार्कवर भाषण करतानाचे फोटो आहेत. तसेच आदित्य ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा देखील फोटो आहे. गेल्या वर्षी शिवाजी पार्कवर मेळावा कोण घेणार असा पेच निर्माण झाला. हा वाद न्यायालयात गेला होता. त्यावेळी शिवसेना कोणाची याबाबत निर्णय झालेला नव्हता.
उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळाली होती. त्यामुळे यंदा पुन्हा एकदा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटात कायदेशीर लढाई होईल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र शिंदे गटाने अर्ज मागे घेतल्याने यंदा देखील ठाकरेंचाच शिवाजी पार्कवर आजाव घुमणार असल्याचं दिसून येत आहे