"देवेंद्रजींचा ‘नाणार’ हट्ट! फडणवीस कोणत्या गुंगीत?; मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे भरकटलेत, रेडे सरकार..."

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 10:38 AM2023-02-06T10:38:14+5:302023-02-06T10:39:35+5:30

सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.

Shivsena uddhav balasaheb thackeray Slams Devendra Fadnavis Over nanar refinery project | "देवेंद्रजींचा ‘नाणार’ हट्ट! फडणवीस कोणत्या गुंगीत?; मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे भरकटलेत, रेडे सरकार..."

"देवेंद्रजींचा ‘नाणार’ हट्ट! फडणवीस कोणत्या गुंगीत?; मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे भरकटलेत, रेडे सरकार..."

googlenewsNext

सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. "फडणवीस हे भराडी देवीच्या दर्शनासाठी कोकणात आले होते की कोकणचे स्मशान करणाऱ्या नाणार रिफायनरीची वकिली करण्यासाठी आले होते?" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच फडणवीस हे कोणत्या गुंगीत आहेत? एकतर मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे ते भरकटले आहेत व 2024 सालाआधीच त्यांचे ‘रेडे’ सरकार कोसळणार याची खात्री पटल्याने ते थयथयाट करीत आहेत असं म्हणत टोला लगावला आहे. भराडी देवीवर इतका विश्वास होता तर मग खोके आमदार गुवाहाटीत रेडय़ांवर स्वार होऊन का गेले? असा सवालही विचारला आहे. 

"नाणारचा प्रकल्प करू नका असा भराडी देवीचाच कौल आहे व तो कौल टाळून काही कराल तर देवीचा कोप होईल. इतके ते जागरूक देवस्थान आहे. अदानींच्या घोटाळय़ामुळे  देशाचे, बँकांचे, एलआयसीचे अजिबात नुकसान झाले नाही अशी ऐतिहासिक थाप ज्या पद्धतीने अर्थमंत्री निर्मलाताईंनी मारली, त्याच बेमालूम पद्धतीने फडणवीस यांनी भराडी देवीच्या साक्षीने नाणार रिफायनरीबाबत थाप मारली! कोकणात पाप व ढोंग चालत नाहीत. ही कोकणची परंपरा नाही. श्री देवी भराडी मातेचा कोप होईल व तुमचे राज्य गुवाहाटीच्या रेडय़ांप्रमाणे बळी जाईल" असं म्हणत सामनाच्या अग्रलेखातून घणाघात केला आहे. 

सामनाचा आजचा अग्रलेख

- उपमुख्यमंत्री फडणवीस हे आंगणेवाडीच्या श्री भराडी मातेच्या दर्शनासाठी गेले ते बरेच झाले. भराडी मातेचा इतिहास असे सांगतो की, जे पापी मनाने दर्शनास गेले त्यांना ती चांगलीच अद्दल घडवते व जे सत्कार्य करून गेले त्यांना आशीर्वाद देते. येथे जादूटोणा, जंतर मंतर वगैरे चालत नाही. त्यामुळे फडणवीस तेथे गेले. 

- माता त्यांना सुबुद्धी देईल. याआधी अनेक नेत्यांनी भराडी देवीकडे राजकीय शक्तिप्रदर्शन करून सत्ता व पैशांची मस्ती दाखविण्याचा प्रयत्न केला. त्या सगळय़ांचा कोकणात पराभव झाला. भराडी देवीच्या दरबारात गद्दार वृत्तीच्या ढोंगी भाविकांना अजिबात मान व स्थान नाही हे समजून घेतले पाहिजे. या वेळी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, उपमुख्यमंत्री, त्यांचे राजकीय भालदार, चोपदार असे असंख्य लोक देवीस गेले. तेथे राजकीय सभा घेतल्या. 

- फडणवीस यांनी देवीचे दर्शन घेतल्यावर त्यांच्या मेंदूवरील विद्वेषाची जळमटे दूर होतील असे वाटले होते, पण तसे झाले नाही. हे चांगले संकेत नाहीत व भविष्यात देवी त्यांना धडा शिकवणार असा हा कौल आहे. जाहीर सभेत फडणवीस यांनी नेहमीप्रमाणेच शिवसेना व ‘ठाकऱ्यां’वर टीका केली. कोकणात रिफायनरी आणणारच असे त्यांनी गर्जून सांगितले. 

- फडणवीस हे भराडी देवीच्या दर्शनासाठी कोकणात आले होते की कोकणचे स्मशान करणाऱ्या नाणार रिफायनरीची वकिली करण्यासाठी आले होते? आंगणेवाडीतील जाहीर सभेत फडणवीस म्हणाले, ‘‘नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत लोकांची दिशाभूल केली गेली. हा प्रकल्प आणला तर आंबे येणार नाहीत असे खोटे सांगितले गेले. मच्छीमारांना सांगितलं गेलं की, मच्छीमारी होणार नाही. रिफायनरीविरुद्ध खोटा प्रचार करून कोकणचे नुकसान केले. आता आम्ही कोकणात रिफायनरी आणणारच!’’ 

- फडणवीस यांनी असा पहेलवानकी षड्डू आंगणेवाडीच्या जत्रेत ठोकला, पण कोकणातील जत्रेत कुस्त्यांचे फड होत नाहीत व कोणी बाहेरच्या पहेलवानाने उगाच येऊन पिचक्या मांडीवर थाप ठोकली तरी कोकणची जनता त्यास धूप घालत नाही. फडणवीस हे कोणत्या गुंगीत आहेत? एकतर मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे ते भरकटले आहेत व 2024 सालाआधीच त्यांचे ‘रेडे’ सरकार कोसळणार याची खात्री पटल्याने ते थयथयाट करीत आहेत. 

- रिफायनरी हवी की नको हे जनता ठरवेल. जनतेच्या फळबागा, शेती, मासेमारी कायमची संपवून कोणी विकासाची भाषा करणार असेल तर तो कोकणी जनतेला संपवण्याचा डाव आहे. कोकणात वायुप्रदूषण व जलप्रदूषण वाढवणारेच प्रकल्प का आणता? अशा प्रकल्पांमुळे तारापूरसारख्या भागात काय हाहाकार माजला आहे ते पाहा. कर्करोगाचे प्रमाण तेथे वाढले आहे की नाही हे भराडी मातेची शपथ घेऊन सांगा. 

- सतत भूकंपाचे धक्के बसत आहेत की नाही, हे जरा सत्य बोला. पहिले म्हणजे नाणार रिफायनरी कोकणात आणण्यापेक्षा गुजरातने महाराष्ट्रातून पळवून नेलेला वेदांत फॉक्सकॉन, एअरबस, ड्रग्स पार्कसारखे प्रकल्प पुन्हा खेचून घेऊन या व त्यातला एखादा मोठा प्रकल्प नाणारात उभा करा. तसे करणार असाल तर तुम्ही खरे, नाहीतर थापा मारत आहात. तेथेच नाणार प्रकल्प येणार म्हणून शेकडो परप्रांतीय उद्योगपती व व्यापाऱ्यांनी कोकणात नाणारच्या आसपास जमिनी खरेदी केल्या. 

-नाणार आणला नाही तर या सगळय़ांचे नुकसान होईल. हे सर्व परप्रांतीय जमीनदार भाजपचे अर्थपुरवठादार म्हणजे छोटे ‘अदानी’ असल्याने श्री. फडणवीस त्यांच्या फायद्याची भाषा बोलत आहेत. कोकणची संस्कृती नष्ट करणारे हे जमीनदार व त्यांची पाठराखण करणारे फडणवीस व त्यांचे सरकार हेच कोकणच्या मुळावर उठले आहेत. त्यामुळे आंगणेवाडीत राजकीय जत्रा भरवून कोकणी जनतेला भूल देता येणार नाही. 

- फडणवीस म्हणतात, ‘भराडी देवीने आम्हाला कौल दिल्याने आम्ही सत्तेत आलो.’ ही तर सगळय़ात मोठी थाप आहे. भराडी देवीवर इतका विश्वास होता तर मग खोके आमदार गुवाहाटीत रेडय़ांवर स्वार होऊन का गेले? कौल घ्यायला ते थेट निर्भयपणे भराडी देवीलाच आले असते, पण भराडी देवीसमोर खोटेपणा व बेइमानी चालत नाही. ही देवी गद्दारांची नसून ‘सत्यव्रतां’ची आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: Shivsena uddhav balasaheb thackeray Slams Devendra Fadnavis Over nanar refinery project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.