"राज्यात गोवरचा हाहाकार अन् मुख्यमंत्र्यांसह मिंधे गटाचे आमदार खोक्यांची शय्या करून झोपलेत"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 10:38 AM2022-11-29T10:38:10+5:302022-11-29T10:38:25+5:30

सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. कोरोना व्हायरस आणि गोवरवरून निशाणा साधण्यात आला आहे.

Shivsena uddhav balasaheb thackeray Slams Shinde fadnavis Government in saamana editorial | "राज्यात गोवरचा हाहाकार अन् मुख्यमंत्र्यांसह मिंधे गटाचे आमदार खोक्यांची शय्या करून झोपलेत"

"राज्यात गोवरचा हाहाकार अन् मुख्यमंत्र्यांसह मिंधे गटाचे आमदार खोक्यांची शय्या करून झोपलेत"

googlenewsNext

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. कोरोना व्हायरस आणि गोवरवरून निशाणा साधण्यात आला आहे. "आज मुंबई-महाराष्ट्र गोवर साथीच्या विळख्यात सापडला असताना ‘आरोग्यमंत्री तानाजी सावंत दाखवा व एक लाख रुपये मिळवा’ असे जाहीर करावे लागणे हे राज्याच्या आरोग्य यंत्रणेचे अपयश आहे. मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या मिंधे गटाचे आमदार आजही खोक्यांची शय्या करून झोपले आहेत, पण गोवरच्या त्रासाने लहान मुले, त्यांचे पालक हैराण आहेत" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. 

"आज मोदी व संपूर्ण सरकार गुजरात विधानसभा निवडणुकीत रंगलंय आणि गुंतलंय! त्यांचे सर्व राजकीय हल्ले सुरू आहेत ते काँगेस आणि राहुल गांधींवर. राज्याराज्यांतील सरकारे पाडून वगैरे ही लढाई पुढे जाणार नाही किंवा 'ईडी'वाल्यांच्या हातात शस्त्र देऊनही कोरोना घाबरून पळ काढणार नाही" असं म्हणत भाजपा आणि मोदी सरकारवर टीका केली आहे. तसेच "चीनमध्ये कोरोना लॉक डाऊनविरोधात जनतेने उठाव केला. तसे मुंबई-महाराष्ट्रात घडू नये म्हणजे झाले! अर्थात कामाख्या देवीच्याच मनात तसे काही असेल तर कोणी काय करावे?" असा सवालही सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. 

सामनाचा आजचा अग्रलेख 

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने तर महाराष्ट्रात गोवरच्या साथीने हाहाकार माजवला आहे. गोवरचे संकट आहेच, पण ज्या पद्धतीने चीनमध्ये कोरोना पसरला आहे ते पाहता महाराष्ट्राला सावधान राहायला हवे. मुंबईसह राज्यभरात गोवरच्या संशयित रुग्णांची संख्या दहा हजारांवर गेली. त्यातले सर्वाधिक 'गोवर' रुग्ण मुंबई शहरात आहेत. 

चीनमध्ये एकाच दिवशी कोरोना रुग्णांची संख्या 40 हजारांवर पोहोचली व आकडा वाढतोच आहे. चीन सरकारने पुन्हा 'लॉक डाऊन'सारखे कडक निर्बंध लागू केले. या लॉक डाऊनच्या विरोधात चीनमध्ये मोर्चे, निदर्शने, आंदोलने सुरू झाली . लॉक डाऊन नको. आता आम्ही जगायचे कसे,' या उद्रेकाच्या भावनेने लोक रस्त्यांवर उतरले आहेत. चीनच्या रस्त्यांवर पोलीस विरुद्ध विद्यार्थी, जनता असा संघर्ष सुरू आहे व त्याची दखल भारताने घ्यायला हवी. 

कोरोनाचे संकट चीनमध्ये असले तरी घोर जगाला लागला आहे. हिंदुस्थानने कोरोनाच्या दोन लाटांशी मुकाबला केला. त्या काळात कोरोना मृतांची हजारो प्रेते गंगेत सोडून देण्यात आल्याचे चित्र जगाने पाहिले. आता ती परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून हिंदुस्थान तयार आहे काय? आज मोदी व संपूर्ण सरकार गुजरात विधानसभा निवडणुकीत रंगलंय आणि गुंतलंय! त्यांचे सर्व राजकीय हल्ले सुरू आहेत ते काँगेस आणि राहुल गांधींवर. 

आजही त्यांना राहुल गांधी हेच त्यांच्यासमोरील 'संकट' वाटत आहे. देशासमोरील इतर सर्व संकटे गौण ठरवून गुजरात निवडणूक जिंकणे हीच त्यांची ईर्षा दिसते, पण चीनच्या सीमेवर कोरोनाचे संकट पुन्हा उभे आहे व ते केव्हाही वावटळीसारखे आपल्याकडे घुसू शकते. राज्याराज्यांतील सरकारे पाडून वगैरे ही लढाई पुढे जाणार नाही पिंवा 'ईडी'वाल्यांच्या हातात शस्त्र देऊनही कोरोना घाबरून पळ काढणार नाही. 

महाराष्ट्राच्या नशिबी या संकटकाळात एक बेजबाबदार व उठवळ आरोग्यमंत्री आला. त्यास परिस्थितीचे गांभीर्य माहीत नाही. त्यामुळे संकटाची तीव्रता जास्त आहे. कोरोना संकटकाळात राज्यात 'ठाकरे सरकार' सत्तेवर होते व सतत दोन वर्षे मुख्यमंत्री ठाकरे एक कुटुंबप्रमुख म्हणून जनतेची काळजी घेत होते, मार्गदर्शन करीत होते. आज ते चित्र नाही. 

कोरोनाप्रमाणे गोवरसाठीही विलगीकरणाची गरज असून हे निर्बंध कठोरपणे अंमलात आणायला हवेत. गोवर नियंत्रणासाठी विलगीकरण व्यवस्था करावी, असे निर्देश जिल्हा प्रशासन व महापालिकांना देण्यात आले हे ठीक; पण ही विलगीकरण पेंद्रे नक्की कोठे असणार, त्याची काय तयारी सुरू आहे त्याबाबतच्या सूचना कोण देणार? 

कोरोना काळात राज्याचे तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे हे लोकांशी संवाद साधून माहिती देत होते. इस्पितळात व कोविड केंद्रांना भेटी देत होते, पण आज मुंबई-महाराष्ट्र गोवर साथीच्या विळख्यात सापडला असताना 'आरोग्यमंत्री तानाजी सावंत दाखवा व एक लाख रुपये मिळवा' असे जाहीर करावे लागणे हे राज्याच्या आरोग्य यंत्रणेचे अपयश आहे. 

मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या मिंधे गटाचे आमदार आजही खोक्यांची शय्या करून झोपले आहेत. कधी आसामचे पर्यटन तर कधी दुसरे काही, पण गोवरच्या त्रासाने लहान मुले, त्यांचे पालक हैराण आहेत. चीनमध्ये कोरोना लॉक डाऊनविरोधात जनतेने उठाव केला. तसे मुंबई-महाराष्ट्रात घडू नये म्हणजे झाले! अर्थात कामाख्या देवीच्याच मनात तसे काही असेल तर कोणी काय करावे?

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Shivsena uddhav balasaheb thackeray Slams Shinde fadnavis Government in saamana editorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.