उद्धव ठाकरेंनी प्रश्न विचारताच अरविंद सावंत खुर्चीवरून उठले; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 16:17 IST2022-08-29T16:16:42+5:302022-08-29T16:17:52+5:30
भाजपानं आम्ही हिंदुत्व तोडलं असा आरोप केला. त्याला छेद देणारी आजची घटना आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी प्रश्न विचारताच अरविंद सावंत खुर्चीवरून उठले; नेमकं काय घडलं?
मुंबई - राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत बिकट अवस्था झाली आहे. पक्षाचे ४० आमदार, १२ खासदार शिंदे गटात सहभागी झालेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी पक्षसंघटना मजबुत करण्यासाठी प्रयत्न सुरु केलेत. त्यात अलीकडेच ठाकरेंनी संभाजी बिग्रेडसोबत युतीची घोषणा केली. त्यानंतर आज बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेतील काही लोकांनी शिवसेनेत प्रवेश केला. संघ परिवारातील लोकांनी शिवसेनेच्या हिंदुत्ववादी परिवारात प्रवेश केलाय असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.
मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी भाजपासह शिंदे गटाला निशाणा साधला. या पत्रकार परिषदेत कळमनुरीचे माजी आमदार संतोष टरफे, शेतकरी नेते अजित मगर यांच्यासह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशावेळी मातोश्रीवर मोठी गर्दी होती. पत्रकार परिषदेत बजरंग दलचे नेते उपस्थित होते. तेव्हा उद्धव ठाकरेंनी शेजारील बसलेल्या अरविंद सावंत यांना त्यांना तुम्ही कुठे बसवणार? असा सवाल केला. तेव्हा सावंतांनी मी उठतो असं म्हणत खुर्चीवरून उठून बाजूला गेले हे दृश्य माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाले.
या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेत प्रवेश रोजचं झालंय. मला अभिमान वाटतो की, सत्ताधारी पक्षात पक्षप्रवेशासाठी रांग लागते. परंतु पहिल्यांदाच महाराष्ट्रात वेगळं चित्र दिसतंय. गद्दारीनंतर महाराष्ट्राची माती ही मर्दांना जन्म देते, गद्दारांना जन्म नाही. याची प्रचिती दाखवणारी मंडळी शिवसेनेकडे येतायेत. भाजपानं आम्ही हिंदुत्व तोडलं असा आरोप केला. त्याला छेद देणारी आजची घटना आहे. त्यात बहुजन, वंचित, मुस्लीम बांधवही शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. महाराष्ट्रातलं हे चित्र देशासाठी मार्गदर्शक ठरेल असं त्यांनी म्हटलं.
तसेच अनेक विषय आहेत, त्या विषयांवर मी दसरा मेळाव्यात बोलणारच आहे. हिंदुत्वाच्या भ्रामक कल्पनेत आपली फरफटत झाली. खरे हिंदुत्व शिवसेनेकडे आहे असं ज्यांना वाटतं त्यांना मातोश्रीचे, शिवसेनेचे दरवाजे उघडे आहेत. केवळ शिवसेनेला भक्कम करण्यासाठी नव्हे तर शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्र, महाराष्ट्राची अस्मिता आणि हिंदुत्व बळकट करण्यासाठी आपण एकत्र यावेत असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.
दसरा मेळावा शिवतीर्थावरच
दसरा मेळावा हा शिवसेनेचाच होणार, तो आमचाच होणार, संभ्रम निर्माण करण्यासाठी कोण काही विधानं करत असेल ते मला माहिती नाही. शिवसैनिकांनी दसरा मेळाव्यास येण्याची तयारी सुरू केली आहे. तांत्रिक, मांत्रिक भाग त्यांचा असेल. शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार. शिवसेना, शिवसैनिक ठाम आहे. शिवसेना रस्त्यावर पडलेली वस्तू नाही कुणीही उचलली आणि खिशात टाकावी. शिवसेनेला ५६ वर्ष झाली. ५६ जण पाहिली. शिवसेना निष्ठावंतावर मोठी होतेय. गद्दारांच्या मेहनतीवर नाही.