वंचित आघाडी मविआसोबत न आल्याने फटका बसणार का?; उद्धव ठाकरेंनी दिलं थेट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 15:11 IST2024-04-09T15:07:45+5:302024-04-09T15:11:16+5:30
Lok Sabha Election 2024: वंचित आघाडी वेगळी लढण्याने मविआला फटका बसेल का, असा प्रश्न यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला.

वंचित आघाडी मविआसोबत न आल्याने फटका बसणार का?; उद्धव ठाकरेंनी दिलं थेट उत्तर
Uddhav Thackeray ( Marathi News ) : महाविकास आघाडीची आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद पार पडली असून या पत्रकार परिषदेतून लोकसभा निवडणुकीसाठी मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला. आघाडीच्या जागावाटपात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला २१, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला १० आणि काँग्रेसला १७ जागा देण्यात आल्याचं यावेळी घोषित करण्यात आलं आहे. तसंच या तीन प्रमुख पक्षांसह माकप, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष हेदेखील महाविकास आघाडीचे घटकपक्ष असतील, असं यावेळी मविआ नेत्यांनी सांगितलं. मात्र प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यास महाविकास आघाडीला अपयश आलं आहे. वंचित आघाडी वेगळी लढण्याने मविआला फटका बसेल का, असा प्रश्न यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला असता त्यांनी याबाबत आपली भूमिका मांडली आहे.
वंचित बहुजन आघाडीबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "ही महाविकास आघाडी जास्तीत जास्त व्यापक कशी होईल, त्यादृष्टीने आम्ही आटोकाट प्रयत्न केले. मला आमच्यासोबत आलेल्या इतर छोट्या पक्षांना धन्यवाद द्यायचे आहेत. कारण देशाचे संविधान वाचवण्यासाठी आम्ही जी ताकद उभी करतोय त्या ताकदीत या इतर पक्षांनी भर घातली. एकही जागा न मागता त्यांनी ही भूमिका स्वीकारली. आम्हाला अशी अपेक्षा होती की प्रकाश आंबेडकर हेदेखील आमच्यासोबत येतील, त्यांना काही जागा देऊ केल्या होत्या. मात्र दुर्दैवाने ते काही शक्य झालं नाही. आम्ही याआधीच आमची भूमिका स्पष्ट केलीय की, आंबेडकर यांनी आमच्यावर काहीही टीका केली तर आम्ही त्या टीकेला उत्तर देणार नाही. कारण त्यांच्याबद्दल आमच्या मनात प्रेम आणि आदर होता, तो आदर आजही कायम आहे. संविधान रक्षणासाठी त्यांनी भूमिका घ्यावी, असं आमचं आजही मत आहे," असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
प्रकाश आंबेडकरांनी ठाकरे-पवारांना काय सल्ला दिला?
प्रकाश आंबेडकर यांनी कालच प्रसारमाध्यमांशी बोलताना मविआ नेत्यांवर निशाणा साधला. "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने स्वतःमध्ये बदल केले नाही तर त्यांची इतर राजकीय संघटना आणि पक्षांसारखीच वाताहत होणार आहे. या निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणातील बऱ्याच गोष्टींमध्ये बदल होतील," असं आंबेडकर म्हणाले. तसंच "महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर एकमत न झाल्याने वंचितने प्रस्ताव फेटाळला. वंचित आणि महाविकास आघाडीचा मार्ग पूर्णपणे वेगळा झाला असून आता प्रचाराला सुरुवात झाल्याने महाविकास आघाडीचा विषय संपला," असंही आंबेडकर म्हणाले.