Uddhav Thackeray : "भाजपा पेंग्विन सरकार म्हणायची, त्यांना 'चिता सरकार' म्हणायचं का?"; उद्धव ठाकरेंचा खोचक सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 03:52 PM2022-09-18T15:52:07+5:302022-09-18T16:04:03+5:30
Shivsena Uddhav Thackeray Slams BJP : "राणीच्या बागेत आम्ही पेंग्विन आणले आणले म्हणून आम्हाला पेंग्विन सरकार म्हणत होता आता तुम्ही चित्ता आणलेत तर तुम्हाला चिता सरकार म्हणायचे का?" असा प्रश्न विचारला आहे.
भारतातून १९५२ साली नामशेष झालेले चित्ते तब्बल ७० वर्षांनंतर भारतात परतले आहेत. मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून ८ चित्ते आणण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांच्याच हस्ते या चित्त्यांना अभयारण्यात सोडण्यात आलं. चित्त्यांनी भारतात पाऊल ठेवल्यानंतरचे खास क्षण यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या कॅमेरामध्ये टिपले. तसंच हा दिवस देशासाठी ऐतिहासिक दिवस असल्याचं ते म्हणाले. यानंतर आता यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
"भाजपा आम्हाला पेंग्विन सरकार म्हणायची, आता त्यांना 'चिता सरकार' म्हणायचं का?" असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी (Shivsena Uddhav Thackeray) विचारला आहे. "राणीच्या बागेत आम्ही पेंग्विन आणले आणले म्हणून आम्हाला पेंग्विन सरकार म्हणत होता आता तुम्ही चित्ता आणलेत तर तुम्हाला चिता सरकार म्हणायचे का?" असा प्रश्न विचारला आहे. तसेच प्रताप सरनाईक यांच्या केसवरूनही हल्लाबोल केला आहे. प्रताप सरनाईकांची केस लोकशाही पेक्षाही मोठी आहे का? मग केस मागे घेण्याची घाई का? असा सवालही ठाकरेंनी विचारला आहे.
"सरनाईक भाजपासोबत गेल्याने लॉन्ड्रीत टाकून चकाचक करण्याचा प्रयत्न"
प्रताप सरनाईक शिंदे गटासोबत गेल्याने शिंदे सरकार त्यांची केस मागे घेण्याची घाई करत असल्याची टीकाही केली आहे. तसेच सरनाईक भाजपासोबत गेल्याने लॉन्ड्रीत टाकून, धूवून चकाचक करण्याचा हा प्रयत्न असल्याचं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. TV9 मराठीने याबाबतचे वृत्त दिले आहे. उद्धव ठाकरेंनी याआधी देखील विविध विषयांवरून भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे.
"तुम्हाला दाखवतो शिवसेना काय आहे ते..."
ठाकरेंनी याआधी मला समोरून आव्हान आले की चेव चढतो. शिवसेना संपविण्याची भाषा उघडपणे केली जात आहे आणि सगळे एकत्र होत आहेत. सगळ्यांनी एकत्र व्हावे, हीच माझी अपेक्षा होती. विरोधकांना वेगवेगळे मारण्यामध्ये काही गंमत नसते. सर्वांनी एकत्र या, मग तुम्हाला दाखवतो शिवसेना काय आहे ते, या शब्दांत आव्हान दिले होते. शिवसेना भवनमध्ये आयोजित विभागप्रमुख व उपविभाग प्रमुखांशी ठाकरे यांनी संवाद साधला. वेदांता-फॉक्सकॉन वादावरही त्यांनी भाष्य केलं होतं. सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातने पळवल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला होता.