Shivsena-VBA Alliance :...तर आता निवडणुका घ्या; उद्धव ठाकरेंचे शिंदे-फडणवीसांना थेट आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 02:20 PM2023-01-23T14:20:16+5:302023-01-23T14:21:09+5:30
Shivsena-VBA Alliance : आज राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली आहे.
Shivsena-VBA Alliance : आज राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. गेल्या दिवसांपासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि प्रकास आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडी एकत्र येण्याची चर्चा सुरू होती. त्यावर आज शिक्कामोर्तब झाला. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची जयंती आहे, या निमित्ताने शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युतीची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'आज बाळासाहेब ठाकरेंचा जन्मदिवस आहे. पुढील वाटचाल करण्यासाठी मी आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आलो आहोत. राजकारण जे चाललंय, त्यावर आघात करण्यासाठी जीवाला जीव देणारे सहकारी एकत्र आले आहेत. देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत,' असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, 'भविष्यातील राजकीय वाटचाल कशी असेल, याबद्दल आम्ही वेळ आल्यावर सांगू. आम्हाला जेव्हा वाटलं की आमच्यासोबत फसवणुकीचा राजकारण होतंय, तेव्हा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेससोबत गेलो आणि मविआ सरकार स्थापन केले. आमचे संबंध कसे होते हे जग जाहिर आहे. काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष कसे येतील असं सर्वांना वाटतं होत. पण आम्ही हे सरकार व्यवस्थित चालवलं,' असंही ते म्हणाले.
आम्हाला काल रात्री स्वप्न पडलं आणि आज एकत्र आलो असं नाही. आमची काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा झाली आणि आमचं आधीच ठरलं की काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांनी आपल्या मित्रपक्षाला आणायचं आणि मित्रपक्षांसोबत हित सांभाळायचं, अजून कोणी कुठल्या जागा लढवायच्या ही वेळ आलेली नाही, वेळ आल्यावर जागा लढवायचा निर्णय होईल, हिंमत असेल तर आता निवडणुका घ्या,' असं आव्हानही उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीसांना दिलं आहे.