BJP vs Shivsena, CM Uddhav Thackeray: "उद्धव ठाकरे बहुधा राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री होणार"; भाजपाचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 01:48 PM2022-05-31T13:48:41+5:302022-05-31T13:49:29+5:30

"उद्धव ठाकरेंच्या हाती घड्याळ बांधणार? म्हणजे राऊतही समाधानी आणि सुप्रियाताईही समाधानी"

Shivsena vs BJP Leaders take dig at Uddhav Thackeray after Sanjay Raut Supriya Sule statements regarding next CM of Maharashtra | BJP vs Shivsena, CM Uddhav Thackeray: "उद्धव ठाकरे बहुधा राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री होणार"; भाजपाचा खोचक टोला

BJP vs Shivsena, CM Uddhav Thackeray: "उद्धव ठाकरे बहुधा राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री होणार"; भाजपाचा खोचक टोला

Next

BJP vs Shivsena, CM Uddhav Thackeray: महाराष्ट्रात २०१९च्या अखेरीस शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांनी मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. तीनही पक्षांच्या विचारधारा भिन्न होत्या, त्यामुळे किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर सत्तास्थापना झाली आणि शिवनेसेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. या सरकारला आता अडीच वर्षे पूर्ण झाली असून कार्यकाळ संपण्यासाठी आणखी अडीच वर्षे शिल्लक आहेत. पण आतापासून पुढच्या टर्मला मुख्यमंत्री कोण असावं यावरून विधानं केली जाऊ लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना, पुढील मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेसचा होऊ दे', असं साकडं सुप्रिया सुळे यांनी देवीला घातल्याचे सांगितले. तर, पुढील २५ वर्षे उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री राहतील, असे विधान शिवसेनेच खासदार संजय राऊत यांनी केले. त्यावरूनच भाजपाने आघाडी सरकारला टोला लगावला.

एकीकडे उद्धव ठाकरे २५ वर्षे मुख्यमंत्री राहणार असं शिवसेनेचे संजय राऊत म्हणत आहेत. दुसरीकडे, अडीच वर्षानंतर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला तर तुळजाभवानीचा नवस फेडणार असं सुप्रिया सुळे म्हणत आहेत. त्यामुळे बहुदा उद्धव ठाकरे राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री होणार, असा खोचक टोला भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला.

भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. "महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री झाल्यास सगळ्या आमदारांसह दर्शनाला येईन, असा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी तुळजाभवानी मातेला केलेल्या नवसाची कालपासून चर्चा आहे. खरंतर कट्टर पुरोगामी मंडळी मंदिरांचे उंबरठे झिजवून देवांना नवससायास करू लागतीत, हे एक आश्चर्यच म्हटलं पाहिजे. बाकी आता देवीच्या आशीर्वादानं राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला तर पुढील २५ वर्षे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहतील, या शिवसेना प्रवक्ते, प्रख्यात ज्योतिषी सामनावीर संजय राऊत यांनी केलेल्या दाव्याचं काय होणार? की हा दावा खरा ठरण्यासाठी आणि सुप्रियाताईंचा नवसही पूर्ण व्हावा यासाठी मध्यममार्ग म्हणून उद्धव ठाकरेंच्या हाती घड्याळ बांधणार? म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहिले म्हणून राऊत समाधानी आणि राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला, म्हणून सुप्रियाताईही समाधानी", असा खोचक टोला उपाध्ये यांनीही लगावला. तसेच, "तुम्ही कितीही दावे तरी पुढचा मुख्यमंत्री हा कुठल्याही फोडाफोडी, तिघाड्यांमधून नाही तर जनतेच्या स्पष्ट बहुमताच्या बळावर निवडून येईल आणि तो मुख्यमंत्री भाजपाचाच असेल!!!", असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सुप्रिया सुळे यांच्या विधानावर राऊत काय म्हणाले-

संजय राऊत म्हणाले, "सध्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत आणि सुप्रिया सुळे यांचेदेखील हेच म्हणणे आहे की, उद्धव ठाकरे हेच पुढील २५ वर्षे मुख्यमंत्री राहणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात असे संभ्रम निर्माण केले जातात. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सोनिया गांधी, राहुल गांधी हे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वशैलीवर खुश आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाबद्दलचे प्रश्न कोणीही निर्माण करत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे."

Web Title: Shivsena vs BJP Leaders take dig at Uddhav Thackeray after Sanjay Raut Supriya Sule statements regarding next CM of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.