सत्तेशिवाय मातोश्रीची चुल पेटणार नाही: नारायण राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 10:38 PM2018-11-12T22:38:22+5:302018-11-12T22:39:12+5:30
वैभववाडीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची जाहीर सभा झाली. नारायण राणे यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली.
वैभववाडी : सत्तेशिवाय मातोश्रीची चुल पेटणार नाही. त्यामुळे सत्तेला लाथ मारण्याची भाषा करीत असले तरी ते कधीही सत्ता सोडणार नाहीत. कारण सत्ता हाच शिवसेनेचा प्राणवायू असल्याची टीका करीत स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री व खासदार यांना लक्ष्य केले.
वैभववाडीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची जाहीर सभा झाली. नारायण राणे यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली. ते म्हणाले, '३९ वर्षे जीवाची पर्वा न करता बाळासाहेबांवरील निष्ठेपायी शिवसेनेत झगडत राहीलो. मराठी माणसांसाठी शिवसेना होती असे भासविण्यात आले. मग महाराष्ट्रातील मराठी युवक युवतींसाठी त्यांनी काय केले? असा प्रश्न उपस्थित केला. सध्याच्या शिवसेनेने धंदेवाईक राजकारण सुरु केले असून जिल्हाचा पालकमंत्री आणि खासदार कुचकामी ठरल्याची टीका करीत साडेचार वर्षांत जिल्हयासाठी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत व राज्य सरकारने काय केले? याचे उत्तर त्यांनी जनतेला द्यावे. मी आणलेल्या प्रकल्पांचीच भूमीपूजन आणि वारेमाप घोषणा करण्यापलीकडे रोजगार आणि विकासाचा कोणताही प्रकल्प पालकमंत्री, खासदार आणि कुडाळच्या आमदाराने आणलेला नाही.
राणे पुढे म्हणाले की, चाळीस वर्षे राज्याच्या राजकारणात आहे. सर्व पक्षांचे राजकारण जवळून पाहीले. परंतु कोणताही पक्ष दीन-दुबळ्यां, जनसामान्यांच्या हिताचे, राजकारण करीत नाही. यावर आपले मत ठाम झाले. त्यामुळेच जनतेच्या हिताचा विचार करुन स्वाभिमान पक्ष काढण्याचा निर्णय आपण घेतला. त्यामुळे जात-धर्म विसरुन 'कोकणी माणूस' म्हणून स्वाभिमान पक्षाच्या पाठीशी राहा, असे आवाहन त्यांनी केले.
विकासाच्या आड येणाऱ्या पक्षांना उध्वस्त करणार
विकासात भरारी मारणारा जिल्हा राज्यात सहाव्या क्रमांकावर होता. परंतु गेल्या साडेचार वर्षांत हा जिल्हा पिछाडीवर गेला आहे. त्याला शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष जबाबदार आहेत. त्यामुळे राज्य आणि जिल्हा विकासाच्या आड येणाऱ्या या सर्वच राजकीय पक्षांना जनमाणसांच्या मनातून उध्वस्त करुन २०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देवू, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.