'राज'कारणात शिवसेनाच ठरली 'दादा'!

By admin | Published: January 30, 2017 10:32 PM2017-01-30T22:32:08+5:302017-01-31T00:09:10+5:30

मनसे आणि शिवसेना यांच्यात गेल्या दहा वर्षांपासून रंगलेल्या राजकीय लढाईत शिवसेनाच

Shivsena was the 'king' in the 'Raj'! | 'राज'कारणात शिवसेनाच ठरली 'दादा'!

'राज'कारणात शिवसेनाच ठरली 'दादा'!

Next
>- बाळकृष्ण परब/ऑनलाइन लोकमत
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील भाऊबंदकी सर्वश्रुत आहे. दोघांमधील मतभेद, टीकाटिप्पण्या आणि वादविवाद यामुळे गेल्या दहा वर्षांत राज्यातील अनेक निवडणुका गाजल्या. पण कालौघात भक्कम संघटनात्मक ताकद असलेली शिवसेना मनसेला वरचढ ठरत गेली. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेने अनेक निवडणुकांत बाजी मारली, तर राज ठाकरेंच्या एककेंद्री नेतृत्वात सुरुवातीला जोरदार मुसंडी मारणाऱ्या मनसेचा राजकीय आलेख दिवसेंदिवस घसरत गेला. दोन्ही भावांमधील मनोमिलनाच्या बातम्याही आल्या, पण मनोमिलन काही झाले नाही. आता मात्र शिवसेना आणि भाजपा यांच्यातील युती तुटल्यानंतर मनसेने स्वत; पुढाकार घेत युतीसाठी प्रस्ताव दिला. एकेकाळी शिवसेनेला नामोहरम करण्याची वक्तव्ये करणाऱ्यांनीच शिवसेनेशी बिनशर्त युती करण्याची तयारी दर्शवली. या प्रस्तावाबाबत उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही, पण राज यांचा युतीचा प्रस्ताव घेऊन जाणाऱ्या बाळा नांदगावकर यांनी तर शिवसेना मोठ्या भावाप्रमाणे असल्याचे सांगितल्याने मनसे आणि शिवसेना यांच्यात गेल्या दहा वर्षांपासून रंगलेल्या राजकीय लढाईत शिवसेनाच दादा ठरल्याचे बोलले जात आहे. 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या झंझावाती नेतृत्वात  शिवसेना महाराष्ट्रात वेगाने वाढत असताना युवा उद्धव आणि राज ठाकरेंनी शिवसेनाप्रमुखांना मोलाची साथ दिली.  तेव्हापासूनच शांत स्वभावाचे उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांप्रमाणेच प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि भाषाशैली लाभलेले राज ठाकरे यांच्यामधून भविष्यात शिवसेनेचे नेतृत्व कोण करणार याची चर्चा शिवसैनिक आणि राजकीय वर्तुळातही रंगू लागली होती.
पुढे उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचे कार्याध्यक्षपद गेल्यापासून राज आणि उद्धव यांच्यात मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली. दरम्यानच्या निवडणुकांमध्ये राज ठाकरेंचे समर्थक असलेल्या नेत्यांची तिकिटे कापून राज ठाकरेंचे खच्चीकरण करण्यात येत असल्याच्या बातम्या आल्या. अखेर 2005 साली नारायण राणेंनी केलेल्या बंडामुळे शिवसेना हादरली असतानाच या बंडाला काही महिने होत नाही तोच राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. राज समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये राडे झाले.  शिवसेनेबरोबरच ठाकरे कुटुंबातही उभी फूट पडली. राजकीय आरोप प्रत्यारोप वैयक्तिक पातळीवर पोहोचले. 
 प्रभावी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या राज यांच्या मनसेकडे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आकर्षित होऊ लागला. काहीसा अडगळीत पडलेला मराठीचा मुद्दा त्यांनी नव्याने जनतेसमोर आणला. मनसेला निवडणुकांत घवघवीत यशही मिळू लागले.  तर शिवसेना मात्र अडचणीत आली.2009 च्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला  दणका दिल्यानंतर 'एकीच मारा लेकीन सॉलिड मारा" हे वाक्य सुनावून राज ठाकरे यांनी आपले उपद्रवमूल्य सिद्ध केले होते.  पण हे यश मनसेला टिकवता आले नाही. मात्र भक्कम संघटनाच्या जोरावर शिवसेना टिकली. 
यादरम्यानच्या काळात दोन्ही भावांमध्ये मनोमिलन करण्याचे अनेक प्रयत्न झाले. अगदी राज आणि उद्धव यांच्या मामांपासून अनेकांनी त्यासाठी पुढाकार घेतला. कौटुंबिक अडीअडचणींच्या प्रसंगी दोन्ही भाऊ  एकत्र आले की मनोमिलनाची चर्चा नव्याने सुरू होई. 2012 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर या चर्चेला अधिकच बळ मिळाले होते. पण मनोमिलन काही झाले नाही. 2014 साली शिवसेना आणि भाजपा यांच्यातील युती विधानसभा निवडणुकीपूर्वी तुटल्यानंतर राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा पुन्हा रंगल्या होत्या. पण दोघे काही एकत्र आले नाहीत. कधी उद्धव तर कधी राज यांनी असे प्रयत्न उधळून लावले.  2012 साली राज यांचे आव्हान परतवून लावत मुंबई आणि ठाण्यातील सत्ता राखल्यानंतर  2014 च्या निवडणुकीत शिवसेनेने युती तुटल्यानंतरही भाजपाला कडवी टक्कर दिली. तर मनसेचा मात्र धुव्वा उडाला. 
सातत्याने भूमिका बदलल्यामुळे मनसेचा जनाधार कमी होत गेला. त्याबरोबरच शिवसेनेला पर्याय ठरण्याचे राज ठाकरे यांचे प्रयत्नही अयशस्वी ठरले. शिवसेनेसमोरील मनसेचे आव्हानही जवळपास संपल्यात जमा झाले. सततच्या पराभवांमुळे मवसे सध्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. त्यामुळे  राज ठाकरेंकडून युतीचा प्रस्ताव आल्यानंतरही शिनसेनेकडून त्याबाबत फार उत्सुकता दाखवण्यात आली नाही. सध्या आपण एकट्याने मुंबईतील सत्ता राखू शकतो. किमान निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो, असा विश्वास शिवसेना नेतृत्वाला आहे. अशा परिस्थितीत  मनसेला सोबत घेऊन आपल्या एकेकाळच्या राजकीय प्रतिस्पर्ध्याला जीवदान दिल्यास ते भविष्यात अडचणीचे ठरण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. त्यामुळेच राज ठाकरे यांचा बिनशर्त युतीचा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांनी नाकारला असावा. पण राज आणि उद्धव यांच्यात दहा वर्षांपूर्वी उघडपणे सुरू झालेल्या राजकीय लढाईत सध्यातरी उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेनाच मोठा भाऊ ठरली आहे, हे मान्य करावे लागेल. 
 

Web Title: Shivsena was the 'king' in the 'Raj'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.