भावाची माया आटली! शिवसेना परळी मतदारसंघातून लढणार निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 04:32 PM2018-02-22T16:32:25+5:302018-02-22T16:53:58+5:30
शिवसेनेच्या या घोषणेनंतर परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि सुभाष साबणे यांच्यात तिरंगी लढत रंगण्याची चिन्हे आहेत.
मुंबई: गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर परळी विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत पंकजा मुंडे यांच्याविरोधात उमेदवार न देणाऱ्या शिवसेनेने आता आपली भूमिका बदलली आहे. शिवसेनेने आगामी विधानसभा निवडणुकीत याठिकाणी पक्षाचा उमेदवार उभा करायचे ठरवले आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वीच मातोश्रीवरून स्थानिक नेत्यांना चाचपणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार पक्षनिरीक्षक आमदार सुभाष साबणे यांनी परळी आणि आष्टी परिसराचा दौराही केला. यानंतर झालेल्या आढावा बैठकीत बोलताना त्यांनी परळीतून विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे सांगितले.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना परळी विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचा संदेश दिला आहे. यामुळे आपण तयारीला लागावे, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले होते. शिवसेनेच्या या घोषणेनंतर परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि सुभाष साबणे यांच्यात तिरंगी लढत रंगण्याची चिन्हे आहेत. याविषयी पंकजा मुंडे यांना विचारले असता, कोणाही निवडणूक लढवावी, मी त्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. जो कोणी असेल त्याला निवडणूक लढवावी लागेल, त्याशिवाय जिंकण्यात मजा नाही. मी मागच्या दाराने आलेले नाही, जनतेतून निवडून आले आहे, असे सांगत पंकजा यांनी धनंजय मुंडे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला.
परळी हा महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा मतदारसंघ आहे. धनंजय मुंडे याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावरुन भाजपमधून बाहेर पडले होते. तेव्हापासूनच या मतदारसंघात भाऊ-बहिणीत मोठी लढत पाहायला मिळते. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर गेल्या निवडणुकीत शिवसेनेने परळी मतदारसंघातून उमेदवार उभा केला नव्हता.