शिवसेनारूपी सावित्रीमुळे भाजपाचा प्राण टिकून, विरोधकांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2018 06:11 AM2018-07-04T06:11:15+5:302018-07-04T06:11:15+5:30
वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला फेऱ्या मारणा-या सौभाग्यवतीसारखी शिवसेनेची अवस्था झाली आहे. संसार टिकविण्यासाठी सेना अपमान गिळत आहे. शिवसेनारूपी सावित्रीमुळेच भाजपाचा प्राण टिकून आहे.
नागपूर : वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला फेऱ्या मारणा-या सौभाग्यवतीसारखी शिवसेनेची अवस्था झाली आहे. संसार टिकविण्यासाठी सेना अपमान गिळत आहे. शिवसेनारूपी सावित्रीमुळेच भाजपाचा प्राण टिकून आहे. सेनेने आता शिवबंधनासारखे जाहीरपणे भाजपाचे मंगळसूत्र बांधावे, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपा-सेना युती सरकारवर हल्लाबोल केला.
विखे यांच्या बंगल्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांची बैठक झाली. बैठकीला विखे पाटील यांच्यासह विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते आ. विजय वडेट्टीवार, पीरिपाचे आ. प्रा. जोगेंद्र कवाडे, आ. सुनील तटकरे, शेकापचे आ. जयंत पाटील, आ. शरद रणपिसे, आ. प्रकाश गजभिये आदी उपस्थित होते. बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत विखे पाटील यांच्यासह धनंजय मुंडे यांनी शेतकरी, शेतमजूर, युवक या सर्वांची सरकारने फसवणूक केली असल्याचा आरोप करीत सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली.
सरकारची एक्स्पायरी ठरलेली : विखे पाटील
नाणार प्रकल्पावरून भाजपा-सेनेत रस्सीखेच सुरू आहे. नाणार होणार की जाणार, हा वाद असला तरी हे सरकार जाणार हे निश्चित झाले आहे. या सरकारची एक्स्पायरी डेट ठरली आहे, असा टोला विखे पाटील यांनी लगावला. ते म्हणाले, सरकारने कर्जमाफी योजनेत ३४ लाख शेतकºयांना फक्त १४ हजार कोटी दिले आहेत. उद्धव ठाकरे यांनाही घोषणेचा विसर पडला आहे. कर्जमाफीनंतर आता बँका शेतकºयांना कर्ज देण्यास नकार देत आहेत. खरीपसाठी फक्त १८ टक्के कर्ज वाटप झाले आहे. प्रत्येक गोष्टीसाठी टिष्ट्वट करणाºया मुख्यमंत्र्यांकडे या गंभीर विषयावर इशारा द्यायलाही वेळ नाही. गेल्या चार वर्षांत सरकारने धनगर, मराठा, मुस्लीम आरक्षणावर अफवा पसरविल्या. मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर आल्यावर फक्त चौकशीचा फार्स करण्यात आला. कृती काहीच झाली नाही. मुंबईचा डीपी प्लान हा बिल्डरसाठी आहे, सर्वसामान्यांसाठी नाही, अशी टीका करीत या सर्व प्रश्नांवर सरकारला सभागृहात धारेवर धरण्याचा इशारा त्यांनी दिला.
घोषणांचा ‘पाऊस’ पडणार: मुंडे
गेल्या अधिवेशनात सरकारने जाहीर केलेली कापूस, धान उत्पादकांना ३७ हजार ५०० रुपयांची मदत मिळालेली नाही. आता सरकार या पावसाळी अधिवेशनात फक्त आश्वासनांचा पाऊस पाडणार आहे, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली. ते म्हणाले, दिवंगत कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी दिलेला शब्दही सरकारने पाळला नाही. प्लास्टिकबंदीचे धोरण कागदावर राहिले. मुख्यमंत्र्यांनी विदर्भात एकही उद्योग आणला नाही. नागपूर हे क्राइम कॅपिटल झाले म्हटले तर मुख्यमंत्र्यांना राग येतो. पण ते येथील कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवू शकले नाहीत, ही वास्तविकता आहे़
- सिडको भूखंड घोटाळाप्रकरणी समोर आलेली कागदपत्रे गंभीर आहेत. ज्या गतीने हे सर्व व्यवहार झाले त्यावरून संशयाची सुई मुख्यमंत्र्यांवर जाते. यासंबंधीची कागदपत्रे सभागृहात मांडू, असे सांगत या प्रकरणात न्यायालयीन नियंत्रणाखाली स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी विखे पाटील व धनंजय मुंडे यांनी केली. ही प्रक्रिया मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय होऊच शकत नाही. अधिकारी एवढे धाडस करणार नाही, असे सांगत त्यांनी कोणत्या भ्रष्टाचाराची कुणामार्फत चौकशी करावी, असे सोयीस्कर धोरण निश्चित केले आहे, अशी टीका मुंडे यांनी केली.