शिवसेनेच्या बाणात उरला नाही ताण !
By Admin | Published: June 18, 2016 12:45 AM2016-06-18T00:45:15+5:302016-06-18T00:45:15+5:30
एकेकाळी शिवसेनेने विदर्भात बऱ्यापैकी पताका रोवली होती. मात्र, गेल्या दहा वर्षात सेनेचे बरेच गड गडगडले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपशी असलेल्या युतीच्या बळावर सेनेला विदर्भातून आपले
- कमलेश वानखेडे (विदर्भ)
एकेकाळी शिवसेनेने विदर्भात बऱ्यापैकी पताका रोवली होती. मात्र, गेल्या दहा वर्षात सेनेचे बरेच गड गडगडले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपशी असलेल्या युतीच्या बळावर सेनेला विदर्भातून आपले चार खासदार दिल्लीत पाठविला आले. मात्र, विधानसभा निवडणुकीत भाजपशी फारकत होताच सेनेची डरकाळी पोकळ असल्याचे स्पष्ट झाले. भाजपने ६२ पैकी ४४ जागा जिंकल्या, तर शिवसेनेला फक्त चार जागा जिंकता आल्या. भाजपचे नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्राबल्य असलेल्या पूर्व विदर्भात तर बाळू धानोरकर (वरोरा, जि. चंद्रपूर) यांच्या रूपात एकच बाण निशाण्यावर लागला. विदर्भाचे एकूणच राजकीय चित्र पाहिले तर धनुष्याला भाजपच्या दोरीचा ताण मिळाला तरच सेनेचा बाण नेम धरतो, अशी परिस्थिती आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजप व शिवसेनेला मिळालेल्या मतांचा हिशेब केला तर लोकसभेत युती नसती तर सेनेचा एकही खासदार निवडून आला नसता हे सेनेला आरसा दाखविणारे वास्तव समोर येते. गडकरी-फडणवीस यांच्या तुलनेत विदर्भात सेनेकडे मोठा चेहरा नाही. खा. भावना गवळी, खा. प्रतापराव जाधव, खा. कृपाल तुमाने हे मतदारसंघापुरते मर्यादित आहेत. आमदारांचेही तेच. राज्यमंत्री संजय राठोड वगळता बाळू धानोरकर (वरोरा, जि. चंद्रपूर), संजय रायमुलकर (मेहकर, बुलडाणा) व शशिकांत खेडेकर (सिंदखेडराजा, बुलडाणा) हे त्यांचा गृहजिल्हाही एकहाती सांभाळण्यास सक्षम नाहीत. अमरावती, गोंदिया, भंडाऱ्यात शिवसेनेचा एकही आमदार नाही. यवतमाळमध्ये भावना गवळी व पालकमंत्री संजय राठोड एकतर्फी किल्ला लढवित आहेत. अकोला, बुलडाणा व वाशिम असे तीन जिल्ह्यांचे पश्चिम वऱ्हाड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्रामध्ये शिवसेनेची पाळेमुळे झपाट्याने वाढली. भाजपाशी युती केल्यानंतर सुरू झालेली सेनेची फरपट आता घुसमटीत रूपांतरित झाली आहे.
विदर्भ विरोधामुळे सेनेला खीळ
पश्चिम महाराष्ट्राकडून विदर्भावर अन्याय झाला, अशी विदर्भातील जनतेची भावना आहे. त्यातूनच वेगळ्या विदर्भाच्या मागणीला पाठबळ मिळते आहे. सेनेची भूमिका कायमस्वरुपी वेगळ्या विदर्भाच्या विरोधात राहिली आहे. त्यामुळे सेनेला विदर्भात भावनिक पाठबळ मिळविता आलेले नाही. याचा फटका पक्ष विस्ताराला बसला.
अशी आहे विदर्भातील शिवसेना
विदर्भात शिवसेनेकडे मोठा चेहरा नाही
चार खासदार, तेही युतीच्या बळावर
चारच आमदार, पूर्व विदर्भात तर एकच
चंद्रपूर, यवतमाळ व बुलडाणा वगळता उर्वरित आठ जिल्ह्यांमध्ये एकही आमदार नाही
खासदार व आमदारांचा
मतदारसंघाबाहेर फारसा प्रभाव नाही
प्रत्येक जिल्ह्यात गटबाजीमुळे खिंडार
नेते भाजपच्या संपर्कात. पालिका व जि.प.मध्येही भाजपच्या साथीनेच सत्ता