शिवसेनेच्या टीकेची दखल घेणार नाही
By admin | Published: February 7, 2017 12:22 AM2017-02-07T00:22:33+5:302017-02-07T00:22:33+5:30
शिवसेनेकडून भाजपावर केल्या जात असलेल्या टीकेचा काहीही परिणाम होणार नाही, त्यामुळे त्यांच्या टीकेची भाजपाकडून दखल घेतली जाणार नाही
पुणे : शिवसेनेकडून भाजपावर केल्या जात असलेल्या टीकेचा काहीही परिणाम होणार नाही, त्यामुळे त्यांच्या टीकेची भाजपाकडून दखल घेतली जाणार नाही, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी स्पष्ट केले. शिवसेनेकडून उपस्थित केल्या जात असलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर जनताच मतदानातून देईल, असे दानवे यांनी या वेळी सांगितले.
पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचार शुभारंभासाठी दानवे पुण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, भाजपाचे प्रमुख प्रतिस्पर्धी हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हेच आहेत. शिवसेनेला भाजपाकडून लक्ष्य केले जाणार नाही. त्यांच्याकडून भाजपावर केल्या जात असलेल्या टीकेचा कोणताही परिणाम पक्षावर होणार नाही.
भाजपाकडून ए व बी फॉर्म देण्यासाठी २ लाख रुपये घेण्यात आल्याचा आरोप काही उमेदवारांकडून करण्यात आला आहे, त्याबाबत दानवे म्हणाले, एखाद्या उमेदवाराला पक्षाची उमेदवारी मिळाली नाही, तर तो असंतोषातून आरोप करतो. यामध्ये कुठलेही तथ्य नसल्याचा खुलासा दानवे यांनी केला.